कनवाड / प्रतिनिधी
कनवाड गावातील म्हैशाळ बंधाऱ्याच्या बांधकामामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते.या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने तीव्र आंदोलन उभे केले. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यश आले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कनवाड गावातील बाधित शेतकऱ्यांकडून सोमवारी सायंकाळी दर्गा चौकात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दस्तगीर इनामदार यांनी केले, तर आभार विकास शेषावरे यांनी मानले.यावेळी कामील इनामदार व राकेश जगदाळे यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा तसेच शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.सभेला मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी भविष्यातही बंधाऱ्यात जाणाऱ्या जमिनींच्या भूसंपादनासाठी तसेच राखीव पाणीसाठ्याच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच म्हैशाळ बंधाऱ्यातून इचलकरंजीला पाणी देण्याच्या चर्चेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “आमच्या हक्काच्या पाण्यावर गदा येऊ देणार नाही. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून त्याच पाण्याचा वापर करावा,” असा इशाराही दिला.आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांनी एकजूट कायम ठेवल्यास भविष्यात शेतकरी अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांकडून संघटनेच्या नियोजित ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा उपक्रमासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देण्यात आली. या उपक्रमामुळे भविष्यात शेतकऱ्यांना वजनासोबतच रिकव्हरीनुसार योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमास खोनमीर बुखारीचाचा, संभाजी जाधव, मियांसाहेब इनामदार, उदय होगले, वाजिद इनामदार, प्रकाश खाडे, सत्तार पटेल, शशिकांत काळे, मोहम्मद इनामदार, महादेव काळे, मुस्तफा इनामदार, भूषण गंगावणे, भारत ढाले, अब्दुल रजाक, अक्षय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.