हेरवाड / प्रतिनिधी
देशाच्या संरक्षणासाठी आपला पुत्र गमावण्याचे दु:ख मोठे असले तरी त्याच्या त्यागाचा अभिमान संपूर्ण देशाला आहे.शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांनी टाकळीवाडी येथील शहीद जवान रोहित खन्नीकुडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन भेटी दरम्यान व्यक्त केले.
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या रोहितच्या बलिदानाने संपूर्ण टाकळीवाडी गाव भावनिक झाले असून,प्रत्येकाच्या मनात अभिमानासोबतच दु:खाचीही तीव्र भावना आहे.शिरोळ तालुक्यातील सैनिकी परंपरा जपणाऱ्या टाकळीवाडीला आ.रोहित पवार यांनी भेट देऊन शहीद रोहित यांच्या आई-वडिलांची, भावाची व इतर कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.यावेळी आपल्या लेकराच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या आईने फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.त्या क्षणी वातावरण अत्यंत भावुक झाले होते.रोहितसारखे वीरपुत्र देशासाठी बलिदान देतात म्हणूनच आपण सुरक्षित आहोत.त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत आ.पवार यांनी कुटुंबियांना धीर दिला. तसेच शासन आणि समाज या दोघांनीही अशा कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पुढे यावे,असेही त्यांनी नमूद केले.यानंतर टाकळीवाडी ग्रामपंचायतीसमोरील अमर जवान स्मारक येथे भेट देऊन आ.पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीद रोहित खन्नीकुडे यांना अभिवादन केले. गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या वीरपुत्राला अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली.या प्रसंगी माजी आमदार राजीव आवळे, रावसाहेब भिलवडे,तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे,शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, डी. पी. कदम, विशाल जाधव, युवा नेते वरुण पाटील, सागर बिरणगे, श्रेणिक नरदे, नितीन चव्हाण, तेजप्रताप माने, अरुण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे,ऑनर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे,माजी सुभेदार संजय बदामे, माजी सैनिक महादेव बदामे,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम चिगरे, भरत निर्मळे, भरमू बदामे, भरत पाटील, पोपट सुतार, वैभव आवटी, गणपती चिगरे, सुरेश कोडोले, विनोद पाटील, इसाक नदाफ, दिलीप शिरढोणे यांच्यासह आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाकळीवाडी गाव आज दु:खात बुडाले असले तरी रोहित खन्नीकुडे यांच्या शौर्यगाथेचा अभिमान प्रत्येकाच्या हृदयात कायम राहणार आहे.