पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर यादव वाडी येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात काढण्यात आली. सकाळपासूनच परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. नागरिक, युवक, महिला व लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग यावेळी पाहायला मिळाला.शोभायात्रेची सुरुवात माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी उपसरपंच सुरेश यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास आणि त्यामागील संघर्ष याची आठवण करून दिली. “जय महाराष्ट्र”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.शोभायात्रेत पारंपरिक ढोल-ताशा पथकांनी विशेष आकर्षण ठरले. भगवा ध्वज हातात घेऊन चालणारे युवक, तसेच विविध सामाजिक संदेश देणारे देखावे यामुळे शोभायात्रेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. काही ठिकाणी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून वातावरण अधिक रंगतदार केले.यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित वेशभूषा परिधान केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संत तुकाराम महाराज यांसारख्या ऐतिहासिक व संत व्यक्तिमत्त्वांचे सजीव दर्शन घडवणारे देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यामुळे तरुण पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.या शोभा यात्रेचे नियोजन छत्रपती शिवाजी नगर यादव वाडी हिंदू चौक यांच्या संयोजकांनी केले होते.यावेळी उपस्थित महेश चव्हाण, सुरेश यादव, योगेश चव्हाण , अनिल खवरे ,राजकुमार पाटील, अशोक खोत, शंकर अर्जुन किशोर गोडसे, अजिंक्य खोत, प्रगटराज -यादव, रामदास बेळेकर, विजय खोत, विनोद यादव, विनायक गावडे, महेश्वरी वारग, अक्षय पाटील ,समाधान येडगे, अनिल पाटोळे अभिषेक सूर्यवंशी, विशाल मोरे, सचिन जरळी, सचिन यादव, अशोक कोळसे विजय पोवार, नितीन चव्हाण, संदीप जाधव, प्रवीण यादव, रणजीत पुजारी, राजेश सूर्यवंशी दत्तप्रसाद तेला, सचिन खोत, शरद गायकवाड, राजू येसूगडे, सुनील पाटील ,मारुती उन्हाळे, रंगराव उन्हाळे ,रणजीत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एकात्मता, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्याचा संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला.