लव्ह जिहाद प्रकरणाची सखोल चौकशी होणार; आमदार गोपीचंद पडळकर यांची शिरोलीत ग्वाही

Spread the love
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी 
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे उघडकीस आलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुलाची शिरोलीला भेट दिली. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.आमदार पडळकर यांनी प्रथम पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शिरोली ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन स्थानिक पातळीवर झालेल्या कारवाईचा आढावा घेतला. यावेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय आणि ग्रामस्थांमधील तीव्र संतापाची माहिती त्यांना दिली.यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, हे प्रकरण केवळ एक गुन्हा नसून यामागे मोठे कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रवृत्ती समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी संघटितपणे कार्यरत आहेत. राज्यात अशा अनेक घटना समोर येत असून, या सर्वांच्या मुळाशी जाऊन तपास करणे आवश्यक आहे.अशा गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास केला जाईल असेही पडळकर यांनी नमूद केले. तसेच, शिरोली ग्रामपंचायतीने या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक करत, इतर गावांनीही असेच सजग राहावे, असे आवाहन केले.यावेळी विविध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांना निवेदन देऊन, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी केली. गावात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याची विनंतीही करण्यात आली . यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, दीपक यादव, अर्जुन चौगुले, राजेश पाटील, संजय पाटील, योगेश खवरे, चंद्रकांत जाधव, निलेश शिंदे, योगेश खाडे, हरी पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!