पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
महाविद्यालयीन तरुणींना प्रेमसंबंधांच्या आमिषाने जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या शाहीद समीर सनदे (वय २२, रा. पुलाची शिरोली) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात फरार असलेल्या त्याच्या साथीदार शाहरूख हुसेन देसाई यालाही पोलिसांनी कऱ्हाड येथून अटक केली असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहीद सनदेने प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत संबंधित तरुणीला विश्वासात घेतले. त्यानंतर खासगी क्षणांचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या माध्यमातून ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंधांसाठी भाग पाडणे, लॉजवर बोलावणे तसेच आत्महत्येची धमकी देत मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून राजारामपुरी पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला आहे. जयसिंगपूर विभागाचे उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक बाबींची छाननी केली जात आहे.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सनदेचा मोबाईल जप्त केला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. मोबाईलमधील चॅटिंग, व्हिडिओ, फोटो तसेच डिलीट केलेला डेटा पुनर्प्राप्त करून तपासात वापरण्याची तयारी सुरू आहे. या डिजिटल पुराव्यांतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित शाहरूख हुसेन देसाई याला पोलिसांनी कऱ्हाड येथून ताब्यात घेतले. देसाई हा महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले असून त्याच्याविरोधातही दोन स्वतंत्र तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात त्याची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.पोलिस तपासात शाहीद सनदेविरोधात यापूर्वीही काही तरुणींशी ओळख करून फसवणूक आणि शोषणाचे प्रकार केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे तपासाची व्याप्ती वाढवून विविध कोनातून चौकशी सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणामुळे पुलाची शिरोलीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन तरुणींना प्रेमाच्या आमिषाने फसवून अशा प्रकारे शोषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.दरम्यान, या प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापनेबाबतही चर्चा सुरू असून तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. मोबाईल फॉरेन्सिक अहवाल, नव्या तक्रारी आणि साथीदारांच्या चौकशीतून या रॅकेटचा विस्तार समोर येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.पोलिस प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींनी प्रेमसंबंधांचा गैरवापर करून केलेल्या कथित कृत्यांमुळे समाजमनात संतापाची लाट निर्माण झाली असून या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.