पुलाची शिरोली लैंगिक शोषण प्रकरणात संताप उसळला; सर्व आरोपींवर कठोर कारवाई होणार – पोलीस अधीक्षक निलोत्पल

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या मुख्य संशयितांसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांची भेट घेऊन संतप्त नागरिकांनी निवेदन सादर केले.या प्रकरणात शाहीद सनदे याला आधीच अटक करण्यात आली असून, त्याचा फरारी साथीदार शाहरुख देसाई यालाही कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांसह इतर संशयितांची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करावे,अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली.“या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन एकाही आरोपीला सोडणार नाही,” अशी ठोस ग्वाही एसपी बसू यांनी दिली. घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली येथे गावबंद आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पोलिसांनी तत्काळ आणि निर्णायक कारवाई करावी, असा दबाव वाढत आहे.तपासासाठी पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यास विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाला “लव्ह जिहाद”चा रंग देत काही नेत्यांनी अशा घटनांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली.या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने एकत्र येत या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पोलिसांची पुढील कारवाई आणि तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!