पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात नागपूर-रत्नागिरी नव्या महामार्गालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून विविध स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव येथील माळवाडी भागात निखिल भाऊसाहेब नागावकर यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकत कारवाई केली.या ठिकाणी मुबारक मौला नायकवडी (रा. बागणी, ता. वाळवा) याने इतर साथीदारांच्या मदतीने ‘पत्ता’ नावाचा जुगार सुरू केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. छाप्यात आरोपींकडून ३० हजार रुपये रोख, ११ मोबाईल हँडसेट, जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहने, तसेच ५२ पत्त्यांचा संच असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत मुबारक मौला नायकवडी याच्यासह निखिल भाऊसाहेब नागावकर (नागाव), बाळासो नायकू निंबाळकर (हेरले), गौरेसाब गुलाब पेंढारी (मुडशिंगी), प्रविण प्रकाश कांबळे (हालोंडी), महेश नारायण चव्हाण (इचलकरंजी), सर्जेराव शामराव पवार (निगवे दुमाला), इम्तियाज इकबाल खतीब (हेरले), शोहेब रियाज मुल्ला (हुपरी) आणि आलम बाबासो खतीब (हेरले) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित अशोक कोळी यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चिठ्ठे करीत आहेत.दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात जुगार अड्ड्यांबाबत सातत्याने चर्चा सुरू होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा अवैध धंद्यांवर कारवाई होत असताना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र काही ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याची चर्चा वारंवार होत होती. त्यामुळे या कारवाईकडे विशेष लक्ष लागले होते.स्थानिकांच्या मते, या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून पोलिसांनी अशाच पद्धतीने सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुबारक नायकवडी याचे नाव यापूर्वीही विविध कारणांनी चर्चेत आले असल्याचे बोलले जात आहे.
चौकट
‘ वरदहस्तामुळे अड्डे सुरू?’ परिसरात चर्चांना उधाण
मुबारक नायकवडी याने गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी जुगार अड्डे चालवल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. काही राजकीय पाठबळाच्या जोरावर हे अड्डे सुरू असल्याचे बोलले जात असून आता पोलिसांच्या कारवाईमुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. महागड्या गाड्या, ऐश्वर्यपूर्ण जीवनशैली आणि लाखोंच्या उलाढालीमुळे नायकवडीचे नाव यापूर्वीही चर्चेत होते. मागील पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही पुन्हा अड्डे सुरू झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नव्या पोलीस प्रशासनाकडून अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी लगाम लागणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.