पुलाची शिरोलीत पीर बाबा उरूस परंपरा आजही जिवंत; शेकडो वर्षांची परंपरा

Spread the love

पुलाची शिरोलीत पीर बाबा उरूस परंपरा आजही जिवंत शेकडो वर्षांची परंपरा; पंचगंगा तीरावर उरूसाला हजारो भाविकांची उपस्थिती

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली गावातील पीर बाबा उरूस हा धार्मिक सलोखा, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम म्हणून आजही जपला जात आहे. सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या उरूसाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले असून दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, गावकामगार पाटील सर्जेराव दादा पाटील कोल्हापूरला जात असताना पंचगंगा नदीपात्रात नविनचबळ दगडाचा जयघोष झाला. त्या दगडाला नमस्कार करून त्यांनी मनोभावे साकडे घातले की, आपले काम यशस्वी झाल्यास एकत्रितपणे उरूस साजरा करू. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या उरूस परंपरेला सुरुवात झाली आणि आजही ती अखंड सुरू आहे.

दरवर्षी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून उरूसाचे आयोजन केले जाते. पीर बाबांचे भक्त आबा मुळाणी यांनी या दर्ग्याची भक्तीपूर्वक सेवा केली. पुढे सर्जेराव दादा पाटील व बाबू पाटील यांना उरूसातील गळेक घालण्याचा मान देण्यात आला. दरग्यावर प्रथम गोड आणि नंतर खारा नैवेद्य अर्पण करण्याची परंपराही आजही कायम आहे.

देणगीतून दर्गा व मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून गुरुवारी आणि अमावस्येला येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. उरूसातील गळेकाचा मान गावकामगार पोलीस पाटील कै. माधवराव पाटील यांच्याकडे होता. त्यानंतर सुरेश आणि राजेश पाटील यांच्याकडे ही परंपरा सुरू आहे.

कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेले पुलाची शिरोली हे गाव औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असून सर्व धर्मीय लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. याच धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून पीर बाबा उरूसकडे पाहिले जाते.

उरूसात कै. बाबू पाटील, कै. गणू पाटील, कै. कृष्णा पाटील व कै. भाऊसाहेब पाटील यांचाही मानाचा सहभाग राहिला आहे. सध्या उरूसाची सेवा मुळाणी घराण्यातील जहांगीर मुळाणी पाहत आहेत.

पीर अहमस्तांविषयी श्रद्धा

पंचगंगा नदीकाठी एका झाडाखाली साधू महाराज म्हणून पीर अहमस्ता वास्तव्याला होते, अशी आख्यायिका आहे. विविध आजारांवर ते अंगारा देत असत आणि त्या श्रद्धेवर आजही भाविकांचा विश्वास आहे. त्यांची कबर सांगली जिल्ह्यातील चप्पल महादेव दर्ग्यात असल्याचे सांगितले जाते.

शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा पुलाची शिरोलीतील पीर बाबा उरूस आजही भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!