पुलाची शिरोली / प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सास्का नागरी पतसंस्था या संस्थेने सहकार क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असून भविष्यातील वाटचालीस दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन संघटन सचिव, केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र व अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन मदन पाटील यांनी केले. ते शिरोली येथे आयोजित सास्का नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभ व सभासदांना भेटवस्तू वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.शिरोली पुलाची परिसरातील प्रतिष्ठित सास्का नागरी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सभासदांना तब्बल २० लाख रुपयांच्या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. शिरोली येथील शिवानी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या संयुक्त कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.अध्यक्षस्थानी मदन पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, कोल्हापूर महापालिका नगरसेवक प्रविण केसरकर, जिल्हा परिषद सदस्या मीना सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे तसेच सास्का नागरी पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन प्रल्हाद खवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मदन पाटील म्हणाले की, सास्का नागरी पतसंस्थेने सुरुवातीपासूनच सामाजिक भान जपत विविध उपक्रम राबवले. केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत संस्थेने विश्वास संपादन केला आहे. लोकांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने घेतलेली ही गरुडझेप सहकार क्षेत्रातील इतर संस्थांसाठी आदर्शवत आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदाभिमुख धोरण यामुळेच संस्थेची प्रगती सातत्याने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सास्का नागरी पतसंस्थेने कोल्हापूर व इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरांमध्ये शाखा विस्तार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ठेवींसह आवश्यक ते सर्व सहकार्य चेंबर ऑफ कॉमर्स आणि केमिस्ट असोसिएशनमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस नवे बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, चेअरमन प्रल्हाद खवरे आणि सर्व संचालकांनी आर्थिक शिस्त, काटेकोर नियोजन आणि दूरदृष्टी याच्या बळावर संस्थेला भक्कम पाया घातला आहे. सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून संस्थेने समाजाशी नाळ घट्ट ठेवली आहे. त्यामुळेच शिरोली परिसरातील सर्व स्तरांतून संस्थेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सास्का नागरी पतसंस्थेने अनेक तरुणांना शिक्षण व उद्योगासाठी आर्थिक मदत करून सक्षम बनवले असल्याचे सांगितले. अडचणीच्या काळात आधार देणारी आणि विश्वासार्हता जपणारी ही संस्था असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तर शिवाजीराव ढेंगे यांनी बँकिंग, व्यवसाय, सहकार आणि सामाजिक कार्य यांची उत्तम सांगड घालत संस्थेने प्रगतीची नवी उंची गाठली असल्याचे नमूद केले. प्रास्ताविकात चेअरमन प्रल्हाद खवरे यांनी सास्का ग्रुप आणि पतसंस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.सुरुवातीपासूनच केवळ नफा कमावणे हा उद्देश नसून समाजोपयोगी कार्यातून लोकांना मदत करणे हेच ध्येय ठेवून संस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या विश्वासामुळेच संस्था सक्षमपणे पुढे जात असून शाखा विस्तार आणि ठेवींची उद्दिष्टे गाठताना समाजभान कायम जपले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.सभासदांना भेटवस्तू देताना दर्जेदार व त्यांच्या आवडीनुसार वस्तू देण्याचा निर्णय संस्थेमार्फत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे स्वागत शाखा चेअरमन सरदार मुल्ला यांनी केले. सूत्रसंचालन एस. डी. लाड यांनी तर आभार प्रदर्शन संचालक जोतिराम पोर्लेकर यांनी केले. यावेळी उद्योगपती राजू यादव, माजी सरपंच पंडित खवरे, नागावचे माजी सरपंच महावीर पाटील, शिरोली ग्रामपंचायत सदस्य शक्ती यादव, तसेच पतसंस्थेचे सर्व शाखांचे चेअरमन, संचालक, सल्लागार संचालक,सभासद, ठेवीदार,खातेदार,कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सास्का नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाने केवळ यशाचा उत्सव साजरा केला नाही,तर सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि विश्वास या मूल्यांची पुनःप्रत्ययकारी जाणीव करून दिली.आगामी काळातही समाजहिताच्या कार्यातून संस्था प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.