आलास जि.प.मतदारसंघात औरवाडची राजकीय मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्धार; बुबनाळमधून उठावाला सुरुवात

Spread the love

बुबनाळ / प्रतिनिधी 

आलास जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून औरवाड गावाची असलेली राजकीय मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मोठ्या उठावाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.या बदलाच्या लढ्याची सुरुवात बुबनाळ गावातून होत असून,त्यासाठी अंतर्गत बैठकांचे सत्र जोरात सुरू झाले आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.औरवाड गावातील काही प्रस्थापित नेत्यांचा राजकीय हस्तक्षेप आलास जिल्हा परिषद मतदारसंघासाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.दादागिरी, हुकूमशाही आणि दबावाच्या राजकारणामुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये असंतोष खदखदत असून, त्याचा उद्रेक आता उघडपणे होत असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर २०२१ साली बुबनाळ गावातील एका युवकावर झालेल्या गंभीर हल्ल्याची घटना आजही गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे.या घटनेत संबंधित युवकाचा एक डोळा निकामी झाला असून,त्या कुटुंबावर झालेला अन्याय आणि आघात आजही बुबनाळ गावात प्रकर्षाने चर्चिला जात आहे.या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून,न्याय न मिळाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये खोलवर रुजली आहे.याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी बुबनाळ गाव पुढाकार घेत असल्याचे बोलले जात आहे.गावोगावी होणाऱ्या अंतर्गत बैठकींतून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असून, ‘दहशतीच्या राजकारणाला आळा घालायचा’ असा सूर या बैठकींमध्ये उमटत आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचारात हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता असून, औरवाड विरुद्ध इतर गावांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.मतदारसंघात परिवर्तनाची लाट उभी राहते की प्रस्थापित सत्तेची पकड कायम राहते,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!