शिरोळ / प्रतिनिधी
बुबनाळ (ता. शिरोळ) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात तडफदार कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले अमोल हिंगणगावे यांना आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून तर साहेबपाशा पाटील औरवाड यांना पंचायत समितीची उमेदवारी राजर्षी शाहू आघाडीतून देण्यात यावी,अशी जोरदार मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली. ही मागणी जैनापूर येथील वाड्यावर करण्यात आली.यावेळी चाळीस वाहनांचा भव्य ताफा, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला. आमदार यड्रावकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. अमोल हिंगणगावे यांचा सात खेड्यांमध्ये मोठा जनसंपर्क असून गेली २३ वर्षे ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थपणे कार्यरत आहेत. महापुरापासून ते कोरोनासारख्या संकटाच्या काळातही त्यांनी अखंडपणे सेवा सुरू ठेवली. युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचा दांडगा परिचय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आलास मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात यावी, तसेच पंचायत समितीसाठी साहेबपाशा पाटील यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी रणजितसिंह माने-पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने केली.यावेळी बोलताना रणजितसिंह माने-पाटील म्हणाले की, शिरोळ तालुक्याचे विकासपुरुष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. योग्य उमेदवारी दिल्यास आमदार यड्रावकर यांची या भागातील सात खेड्यांपर्यंत पोहोच अधिक मजबूत होईल आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय निश्चित होईल.आमदार यड्रावकर यांनी सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन, जात-पात व धर्म न पाहता समाजकारण करत उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. प्रारंभी रणजितसिंह माने-पाटील यांच्या हस्ते आमदार यड्रावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गोमटेश दूध संस्थेचे चेअरमन नभीराज मरजे यांनी केले.यावेळी शेडशाळचे माजी सरपंच आण्णासो नाईक,अमरदादा शिंदे, कवठेगुलंद यांच्यासह पाणीपुरवठा समितीचे चेअरमन भरत किनिंगे,तंटामुक्त अध्यक्ष गौतम किनिंगे,माजी सरपंच अफसर मकानदार, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच व विविध गावांतील शेकडो प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.