शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काँग्रेस,स्वाभिमानी शिवसेना उध्दव ठाकरे गट महाविकासआघाडी एकत्रितपणे आणि पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.सर्वच मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.ही घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते मधुकर पाटील आणि तालुका प्रमुख संजय अणुसे यांनी पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात शिरोळ तालुक्यातील जागावाटप अंतिम झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार एकूण ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती मतदारसंघांचे पक्षनिहाय वाटप करण्यात आले आहे.काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेसाठी आलास, दत्तवाड व यड्राव हे मतदारसंघ मिळाले असून पंचायत समितीसाठी दानोळी,अर्जुनवाड,नांदणी,शिरढोण, अब्दुललाट व आलास या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्हा परिषदेसाठी अब्दुललाट,नांदणी व दानोळी, तर पंचायत समितीसाठी अकिवाट, दत्तवाड, गणेशवाडी,कोथळी, उदगांव व चिपरी हे मतदारसंघ देण्यात आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना जिल्हा परिषदेसाठी उदगांव व पंचायत समितीसाठी यड्राव व टाकळी हे मतदारसंघ मिळाले आहेत.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असून तालुक्यातील सर्व मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार आहे. काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील यांनी विकासासाठी अनुभव,ताकद व एकजूट महत्त्वाची असून ती महाविकास आघाडीत असल्याचे सांगितले.शिवसेना उबाठा गटाचे नेते मधुकर पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन केले.या पत्रकार परिषदेस स्वाती सासणे, शेखर पाटील, महावीर अक्कोळे, राम शिंदे, सचिन शिंदे, विठ्ठलराव मोरे, विशाल चौगुले, राहुल सूर्यवंशी, अजित दानोळे, राजगोंड पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या एकत्रित घोषणेमुळे शिरोळ तालुक्यातील स्थानिक निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.