थकीत ४२९ कोटी एफआरपी व्याजासह द्या, घोडावत खांडसरीचा गाळप परवाना रद्द करा अंकुशचे निवेदन

Spread the love
  1. कोल्हापूर / प्रतिनिधी 

थकीत ४२९ कोटी रुपयांची एफआरपी रक्कम १५ टक्के व्याजासह तातडीने देण्यात यावी, थकीत व्याज वसुलीसाठी ऑडिटरमार्फत तपासणी करावी तसेच घोडावत खांडसरीचा गाळप परवाना रद्द करावा,अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबत साखर सह संचालक (कोल्हापूर) अर्चना डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,ऊस गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. विभागातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी पहिल्या मस्टरची ऊस बिले अदा केली असून त्यानंतरच्या तीन मस्टरची ऊस बिले मात्र थकवण्यात आली आहेत.सध्या बाजारात साखर व उपपदार्थांना चांगले दर मिळत असून कारखाने नफ्यात असतानाही शेतकऱ्यांची ऊस बिले मुद्दाम थकवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.ऊस नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार थकीत कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह थकीत रक्कम देण्याची स्पष्ट तरतूद आहे.त्यामुळे आपल्या विभागांतर्गत ज्या साखर कारखान्यांनी मुदतीत ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांना १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याचे आदेश देण्यात यावेत,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.घोडावत खांडसरी ही यड्रावकर इंडस्ट्रिजकडून चालवली जात असून, या कारखान्याने गत हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत.तसेच चालू हंगामातील पूर्ण एफआरपीही अदा केलेली नाही.त्यामुळे या कारखान्यास आयुक्तांनी दिलेला गाळप परवाना रद्द करण्याचा अहवाल पाठवावा,अशी ठाम मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे.निवेदनावर धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, प्रमोद बाबर, संभाजी शिंदे, बाळासो मोगावे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!