शिरोळ / प्रतिनिधी
घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही “बलशाही युवा हृदय संमेलन”चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय भव्य सोहळा ९ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत होणार असून, शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख, निवृत्त सनदी अधिकारी ह.भ.प. इंद्रजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम संपन्न होत आहे. स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या संमेलनातून युवक-युवतींमध्ये राष्ट्रभक्ती,चारित्र्यनिर्मिती,सामाजिक भान व उद्यमशीलतेची प्रेरणा देण्याचा उद्देश आहे.शुक्रवारी (दि. ९) सकाळी १० वाजता संमेलनाची सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती मित्तल पटेल यांचे “समानता की राह पर” या विषयावर व्याख्यान होईल. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ लेखिका श्रीमती मुक्ता चैतन्य यांचे स्क्रीन टाईप डिजिटल डिटॉक्स या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तिसऱ्या सत्रात व्यावसायिक तज्ञ ओंकार माळी यांचे स्टार्टअप एक्स्पोर्ट या विषयावर व्याख्यान होईल.तसेच पर्यावरणकार सतीश खाडे यांचे “तळ्यातच्या पायाच्या भेगा भरशील का रे मेघा” या विषयावर संवेदनशील मांडणी होणार आहे.
शनिवारी(दि. १०) सकाळी ९ वाजता डॉ. उज्वल कुमार चव्हाण यांचे अभ्यासासाठी उपयुक्त मार्गदर्शन सत्र होईल. यानंतर कादंबरीकार मनोज बोरगावकर, गावरान कुकुटपालन क्षेत्रातील यशस्वी उद्योजक सौरभ तापकीर आणि ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती फातिमा शबाना यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.याच दिवशी “शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त मधुसूदन सुर्वे यांची धैर्य आणि समर्पणाची यशोगाथा”या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.रात्री शहीद कुटुंबीयांचा सन्मान व “लहराये तिरंगा” हा देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (दि. ११) सकाळी ७ वाजता ह.भ.प. कांचनताई खोत व ह.भ.प.स्वामीराज भिसे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर युवा समाजसेवक सिद्धेश लोकरे यांचे “सफर सपनों का” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होईल. शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक ह. भ. प. इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाने या संमेलनाचा समारोप होणार आहे.या संमेलनात महाराष्ट्रभरातून पाच हजारांहून अधिक युवक-युवती सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज असून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कुमार पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, सचिव प्रताप भोसले, खजिनदार प्रताप कुंभार यांच्यासह यतिन सावंत, विश्वनाथ खोत,डॉ.अशोक सावंत, भगवान नलावडे, देवेंद्र पिसाळ, धनंजय पवार, सलीम मुल्ला, सुहास पाटील, डॉ. सुशांत मोहिते, सौ. विजयालक्ष्मी शेट्टी, सौ. सुनिता गरुड, तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विश्वस्त, विभाग प्रमुख, शिवम साधक, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.