यादव आघाडी पाणी पुरवठा ठेकदार बदलणार की दुर्लक्ष करणार ? धनाजी चुडमुंगे यांचा प्रश्न 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेची दुसरी पंचवार्षिक निवडणूक यंदा जोरदार आरोप – प्रत्यारोपांमुळे चांगलीच गाजली.नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचा दारुण पराभव झाला असून शिव – शाहू प्रणित यादव पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे.या विजयामुळे शिरोळच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून नव्या सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शिव – शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.विशेषतःपाणीपुरवठा योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी,निकृष्ट दर्जाची कामे,तसेच ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. पाणी पुरवठा ठेकेदार बदला यासह अनेक मुद्देही प्रचारात मांडण्यात आले होते.आता पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादव आघाडीला पूर्ण बहुमत मिळाल्याने हे आरोप प्रत्यक्ष कृतीत उतरवले जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याच पार्श्वभूमीवर आंदोलन संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे. प्रचाराच्या वेळी भ्रष्टाचार दोषींवर कारवाई व पाणी पुरवठा ठेकेदार बदला अशी भाषा करणाऱ्या यादव आघाडीने सत्तेत आल्यानंतर नेमकी काय भूमिका घेणार, असा सवाल त्यांनी केला आहे.जर खरोखरच पाणीपुरवठा काम निकृष्ट आणि गैरव्यवहार झाले असेल,तर दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हे आरोप केवळ निवडणूक जिंकण्यासाठी होते,असा समज नागरिकांमध्ये निर्माण होईल असे चुडमुंगे यांनी सांगितले. त्यामुळे यादव आघाडी आता चौकशी करून दोषींवर कारवाई करणार की प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार ? याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!