शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाई आणि घरफाळा आकारणीत झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे जनतेच्या मनात पेटलेले असंतोषाचे रान अखेर नगरपालिकेच्या निवडणुकीत स्फोटक रूपात पहायला मिळालं. या रोषाने सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचा पानिपत करत यादव पॅनेलला पुन्हा एकदा शहराच्या राजकारणात गरुडझेप घेण्याची संधी दिली.हा विजय म्हणजे केवळ राजकीय डावपेचांचा नव्हे,तर शिरोळवासीयांच्या निष्ठेचा आणि मूलभूत प्रश्नांवरील जागरूकतेचा स्पष्ट कौल असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.शिरोळ नगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक ही अनेक अर्थांनी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली.गतवेळच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. या विजयातून शिरोळ नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटील यांना मान मिळाला होता.त्यांच्या कार्यकाळात भुयारी गटार योजना पूर्णत्वास गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केला जात होता. मात्र,पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचा प्रश्न सुटला नाही,उलट रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना आणि घरफाळा आकारणीत झालेल्या अनियमितता,एकहाती कारभार यामुळे झालेली आघाडीच्या प्रमुखांची नाराजी यामुळे नागरिकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली.हीच नाराजी यादव पॅनेलचे नेते पृथ्वीराज यादव यांच्या पथ्यावर पडली.त्यांनी या निवडणुकीत ‘डोक्याने खेळलेली’ राजकीय लढाई सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली.यादव पॅनेलने प्रचारादरम्यान विकासाच्या मोठ्या घोषणा न करता थेट जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर बोट ठेवले.भ्रष्टाचार, “पाणी कधी येणार?” आणि “घरफाळा का वाढला?” हे प्रश्न त्यांनी प्रत्येक प्रभागात पोहोचवले.याच मुद्द्यांवर शिरोळवासीयांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसत होते. मात्र,आमदार यड्रावकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तो शेवटपर्यंत नेला.त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले माजी आमदार उल्हास पाटील तसेच माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांची साथ लाभली.मात्र,ही सलगी जनतेच्या कितपत पचनी पडली,याचे उत्तर निवडणूक निकालाने दिले आहे.सत्तेसाठी पक्षांतर, आघाड्यांचे बदलते समीकरण आणि नेत्यांची जवळीक यापेक्षा नागरिकांना आपल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक अधिक महत्त्वाची असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे पृथ्वीराज यादव यांनी शिवशाहू आघाडी स्थापन करत व्यापक सामाजिक आणि राजकीय पाठबळ उभे केले.या आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा जाहीर पाठिंबा मिळाला.या पाठबळामुळे यादव पॅनेलला मतदारांमध्ये विश्वासार्हता मिळाली.प्रचारात पाणीपुरवठा योजना आणि घरफाळा भ्रष्टाचार हेच मुख्य मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आणि त्यालाच मतदारांनी पसंती दिली.महायुतीच्या नेत्यांसाठी मात्र ही निवडणूक आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे.हातकणंगलेचे विद्यमान आमदार दलितमित्र अशोकराव माने यांच्या ताराराणी आघाडीला भाजप नेते,गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे सहकार्य लाभले.या सहकार्याच्या जोरावर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यात आली.मात्र,ही मोट अपेक्षेप्रमाणे मजबूत ठरली नाही.बदललेली राजकीय समीकरणे आणि अचानक उभ्या राहिलेल्या तिसऱ्या आघाडीचा नेमका अजेंडा मतदारांच्या पचनी पडला नाही.परिणामी नागरिकांनी मतदान यंत्रातून आपला राग व्यक्त केला.एकूणच ही निवडणूक तिरंगी लढतीची असली तरी तिसऱ्या आघाडीचा फटका प्रामुख्याने राजर्षी शाहू विकास आघाडीला बसला की काय,अशी चर्चा शिरोळ शहरात रंगू लागली आहे.सत्ताधाऱ्यांविरोधातील मतांचे विभाजन झाले असते,अशी अपेक्षा काही नेत्यांना होती. मात्र,प्रत्यक्षात जनतेने स्पष्ट भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.या निकालाने हे स्पष्ट केले आहे की,विकासकामांच्या दाव्यांपेक्षा जनतेला मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पूर्तता महत्त्वाची आहे.पाणी, करआकारणी, पारदर्शकता आणि प्रामाणिक कारभार हेच मुद्दे नगरपालिकेच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे शिरोळच्या निकालाने दाखवून दिले. यादव पॅनेलचा विजय हा केवळ एका गटाचा विजय नसून,तो जनतेच्या असंतोषाचा आणि अपेक्षांचा कौल आहे.आगामी काळात या नव्या कारभाऱ्यांकडून शिरोळवासीयांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला गती देणे,घरफाळा आकारणीत पारदर्शकता आणणे आणि नगरपालिकेचा कारभार अधिक लोकाभिमुख करणे,हेच या निवडणुकीचे खरे फलित ठरणार आहे. शिरोळच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही निवडणूक भविष्यातील स्थानिक राजकारणासाठी महत्वपूर्ण ठरणार यात शंका नाही.