हातकणंगले – कुंभोज रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात; ऊसाची ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक ठप्प

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

हातकणंगले – कुंभोज या प्रमुख मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनेक तास उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रॉली हटवण्यासाठी अद्याप क्रेन अथवा अन्य यांत्रिक मदत न पोहोचल्याने वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.सदर अपघातामुळे शिवपुरीपर्यंत तसेच पुढे इंडो काउंट कंपनीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुचाकी,चारचाकी,अवजड वाहने तसेच शालेय वाहने या वाहतूक कोंडीत अडकून पडली असून नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.विशेषतः कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित होते.मात्र संबंधित यंत्रणांकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात असल्याने अशा अपघातांची शक्यता नेहमीच असते. तरीही वाहतूक नियंत्रण व आपत्कालीन यंत्रणा तत्पर नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.दरम्यान, वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासनाने तातडीने क्रेनची व्यवस्था करून अपघातग्रस्त वाहने हटवावीत व रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी ठरावीक वेळा व मार्ग निश्चित करावेत,अशीही मागणी करण्यात येत आहे.वाहतूक सुरळीत न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!