माले / प्रतिनिधी
कोल्हापूर-सांगली महामार्गावरील माले फाटा येथे आज सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दिव्या कानिफनाथ भोसले (वय २२, रा.राजारामपुरी,मूळ नानज, सोलापूर) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर तिची मैत्रीण देविका भुते गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे असलेल्या संजय घोडावत विद्यापीठात दिव्या आणि देविका या दोघी एमसीए प्रथम वर्षात शिक्षण घेत होत्या.आज विद्यापीठात परीक्षा असल्याने त्या दोन विद्यार्थी मित्रांसह MH10 DW 0700 या भाड्याच्या इनोव्हा कारने सकाळी साडेआठच्या सुमारास कोल्हापूरहून विद्यापीठाकडे जात होत्या.परीक्षा संपल्यानंतर देविका भुते हिच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जाण्याचा त्यांचा बेत होता.माले फाट्याजवळ MH09 EM 6290 हा ‘छोटा हत्ती’ टेम्पो स्क्रॅपच्या प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्यांनी भरलेला पुलाशेजारी उभा होता.त्याचा चालक विशाल गोसावी हा जवळच्या ओढ्यात बाटल्या गोळा करण्यासाठी उतरला असताना भरधाव वेगाने धावणाऱ्या इनोव्हा कारने टेम्पोला मागून जोराची धडक दिली.धडकेचा जोर इतका प्रचंड होता की इनोव्हा हवेत उडून तब्बल तीनदा पलटी झाली.कारमधील दोन्ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून रस्त्यावर काचांचा खच पडल्याने वाहतूक कोंडी झाली. अपघातानंतर नातेवाईकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आणि कारचालकावर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. चालक ईशान धुमाळ याचे स्थानिक पातळीवर ‘प्रस्थ’ असल्याने दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.या निषेधार्थ नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.