श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनचा अखंड गजरात समाधी स्थळी मानाचा गलेफ अर्पण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस रविवारपासून धार्मिक व भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा होत आहे.मंगळवारी श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस.यानिमित्ताने श्री बुवाफन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात रीघ लागली होती.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस समिती आणि शिरोळ नगर परिषदेच्यावतीने सायंकाळी शाही मिरवणुकीने मानाचा गलेफ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि भाविकांच्या गर्दीत श्री बुवाफन महाराज समाधीस अर्पण करण्यात आला.

 

दिवसभर श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनचा अखंड जयघोष करीत भाविकांनी दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त मंगळवारी सकाळी गावातील बिनदाती व दोनदाती बैलगाडी,गावातील घोडागाडी,गावातील दुबैली गाड्यांच्या शर्यती पार पडल्या. यानंतर महिला व पुरुष गटातील मॅरेथॉन स्पर्धा, हातगाड्या स्पर्धा, महिला व पुरुष गटातील सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. विजेत्या स्पर्धकांना समितीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

 

मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रातील मान्यवर गावातील प्रमुख मानकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय ते श्री बुवाफन महाराज मंदिरापर्यंत पारंपारिक वाद्याच्या गजरात मानाच्या गलेफाची मिरवणूक काढण्यात आली. आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने, आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, अमरसिंह शिंदे,उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष किरण माने गावडे,यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या व उत्सव आणि उरूस समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते श्री बुवाफन महाराज समाधी स्थळी मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनचा अखंड जयघोष करीत भाविकांनी परिसर दणाणून सोडला.

रात्री नृत्यांगना ज्योत्स्ना सपकाळ यांचा पाव्हणं चीज मी लय कडक हा बहारदार लावणी मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य हा उत्सव आणि उरूस साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

 

बुधवारी विविध स्पर्धा, शर्यती आणि कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. हजरत नूरखान बादशाह दर्गाह येथे गंधरात्र हा धार्मिक सोहळा होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!