मौजे आगर / प्रतिनिधी
मौजे आगर येथील शाहू विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी १ वाजता संस्थेच्या कार्यालयात किरकोळ वाद वगळता उत्साही वातावरणात पार पडली.मात्र,संस्थेचे नियमित वेळेवर सुरू नसल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत सभासदांनी जोरदार आवाज उठवला.संस्था वेळेत सुरू होत नसल्याने सभासदांनी संस्थेचे काम वेळेवर होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत,सचिव दिलीप गावडे यांच्याकडे दोन संस्था असल्यामुळे ते बहुतेक वेळा शिरोळमध्ये उपस्थित असतात, असा मुद्दा मांडला.कोणत्याही कामासाठी शिरोळला जावे लागते,ज्यामुळे वेळ,पैशाची नासाडी होते.पेट्रोल खर्चदेखील एका वेळेस ३५ रुपये होतो.त्यामुळे संस्था मौजे आगर येथे नियमित वेळेवर सुरू का नसते असा सवाल करत सचिव तसेच चेअरमन व व्हा.चेअरमन यांना सभासदांनी धारेवर धरले.दरम्यान, संचालक मंडळाने याबाबत चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तसेच थकबाकीदारांची वाढती संख्या पाहता संस्थेच्या आर्थिक अडचणींबाबत चिंता व्यक्त करत सभासदांनी थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.यावर सचिव दिलीप गावडे यांनी तत्काळ प्रतिसाद देत थकबाकीदारांची नावे जाहीर केली व त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले. यामुळे सभासद शांत झाले.सभेची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.चेअरमन गजानन चव्हाण,व्हा.चेअरमन अशोक पाटील, व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले.स्वागत सुभाष चव्हाण यांनी केले.प्रास्ताविकात चेअरमन गजानन चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत,सभासदांच्या सहकार्याने संस्था आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.सचिव दिलीप गावडे यांनी संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे नमूद करत,संस्थेला चालू वर्षी ‘अ’ वर्ग ऑडिट प्राप्त झाले असून सभासदांना यंदा 10 टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे सांगितले.सभेला सरपंच अमोल चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख,माजी तंटामुक्त अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.