नांदणी येथील १२०० वर्षांची परंपरा लाभलेल्या मठातील श्रद्धेचा आणि अध्यात्मिक नात्याचा भाग असलेल्या माधुरी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.या निर्णयामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे आणि संजय चौगुले यांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन देऊन, या प्रकरणात शिवसेनेने सर्व ताकद लावावी अशी मागणी केली आहे. PETA या संस्थेने न्यायालयात सादर केलेली माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.माधुरी ही केवळ एक प्राणी नसून, श्रद्धेचा केंद्रबिंदू असल्याचे नमूद करत,तिचे स्थानांतर हे भावनिक वेदनेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.याआधीही ज्योतिबा डोंगरावरील ‘सुंदर’ हत्ती नेण्यात आला होता,तर शेडबाळ मंदिरालाही नोटीस आली असल्याचे समजते.यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मठ-मंदिरांच्या परंपरेवर धोका निर्माण झाला आहे, असे जिल्हाप्रमुख उगळे यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर चालू लोकसभा अधिवेशनात शिवसेना खासदारांनी आवाज उठवावा,तसेच महामहीम राष्ट्रपतींकडे लोकभावना मांडून सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.