कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे
इचलकरंजी -पुरवठा कार्यालयातील अनागोंदी, कामात चालढकलपणा व प्रदीर्घकाळापासून प्रलंबित कामे या संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची कानउघडणी करत चांगलीच झाडाझडती घेतली. येत्या चार दिवसात प्रलंबित कामे अपडेट करावीत असा इशारा देतानाच या प्रश्नी सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.येथील पुरवठा कार्यालयाकडून रेशनकार्ड व तत्सम कामासंदर्भात वारंवार चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. शिवाय रेशनधान्य मिळण्यासाठी आवश्यक बारा अंकी क्रमांक संदर्भात अनेक नागरिकांनी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. परंतु कार्यालयाकडून सर्व्हर डाऊन असल्याचे कारण पुढे करत ही कामे प्रलंबित ठेवली आहेत. शिवाय ज्यांना बारा अंकी क्रमांक आहे त्यांना धान्य चालू करण्याबाबत अनास्था दर्शविली जात आहे. या सर्व प्रश्नांबाबत नागरिकांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे गार्हाणे मांडले होते. त्याची दखल घेत मंगळवारी सकाळी आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचार्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, पुरवठा अधिकारी दिनेश आडे, सुरेखा पोळ, सीमा आगाशे, तेजस्विनी पाटील, कल्पना खाडे, आशिष पाटील आदी उपस्थित होते.यावेळी आमदार आवाडे यांनी अधिकारी व कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी करत सर्व्हर डाऊन आहे, वेबसाईट बंद आहे अशी कारणे सांगणे बंद करुन नागरिकांची कामे मार्गी लावा असे सांगतानाच संगणकावर संबंधित वेबसाईट उघडण्यास लावली असता ती सुरळीतपणे सुरु असल्याचे निदर्शनास आले. रेशनकार्डवर बारा अंकी क्रमांक संदर्भातील सर्व अर्ज तातडीने मार्गी लावण्यासह ज्यांना क्रमांक आहे त्यांचे अन्नधान्य सुरु करावे, नवीन नोंदणीप्रमाणे धान्याचा कोठा वाढवून घेणेबाबत सूचना केल्या. यावेळी इचलकरंजी पुरवठा कार्यालयाकडे आवश्यक कोठा शिल्लक नसल्याचे सांगितले असता आमदार आवाडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांशी संपर्क साधत माहिती जाणून घेत तातडीने इचलकरंजीसाठीचा कोठा वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी त्याला मान्यता दिली. तर बारा अंकी क्रमांकानुसार आवश्यक तो धान्य कोठा आपण शासनाकडून मंजूर करुन घेऊ असे सांगितले.
चर्चेअंती येत्या चार दिवसात सर्व प्रलंबित कामे अपडेट करुन घेण्यात यावीत. या संदर्भात पुन्हा सोमवारी बैठक घेऊ, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
यावेळी संजय केंगार, रमेश पाटील, पै. अमृत भोसले, अनिल शिकलगार, सुखदेव माळकरी, बाळासाहेब कलागते, बाळासाहेब माने, विनायक बचाटे, राजू बोंद्रे, सुखदेव माळकरी, मिंटु सुरवसे, राजू भाकरे, रामा पाटील, राजू दरीबे, प्रदीप दरीबे, विनायक शिंगारे आदी उपस्थित होते.