सभासद करून घेण्याच्या लेखी आश्वासनानंतर महार सोसायटीच्या सभासदांचे आंदोलन स्थगित

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील महार सोसायटीच्या ५७ सभासदांना शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर२०२४ पर्यंत सभासद करून घेवून ज्या अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून सभासदांच्यावर अन्याय केला आहे. त्यांची स्वतंत्र अधिकारी नेमुन चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा निबंधक कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक चंद्रकांत इंगवले यांनी लेखी पत्राद्वारे आंदोलकांना दिली. यामुळे महार सोसायटीच्या सभासदांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे.
शुक्रवारी तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या दालनात आंबेडरवादी पक्ष संघटना पदाधिकारी व आंदोलक यांच्यासोबत बैठक बोलवण्यात आली होती .शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे हे कोल्हापूर येथे निवडणुक खर्चाचा हिशोब देण्यासाठी गेले होते . त्यामुळे सदरची बैठक शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीस तहसिलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड,कोल्हापूर जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकारी इंगवले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.सुरवातीस सहाय्यक निबंधक नादरे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आंबेडरवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण काही बोलू नका असे सांगितले. त्यानंतर त्यांना बैठकीत शांत बसविण्यात आले.आंदोलकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,आण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.धरणगुत्तीतील महार सोसायटीमध्ये सन १९३९ ते २०२१ पर्यंत एकूण ५७ सभासद होते. पण शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून संस्थेचे केवळ १२ च सभासद कायम असल्याचा निर्णय घेत एकूण ४५ सभासदांचे सभासदत्व नाकारले होते. सर्व ५७ सभासद करून निर्णय आजच द्यावा यासाठी कार्यकर्ते बैठकीत आक्रमक झाले होते.निर्णय होत नाही तोवर शिरोळ सहाय्यक निबंधक कार्यालयातील एकही अधिकारी सभागृहाच्याबाहेर सोडणार नाही अशी भुमिका कार्यकर्त्यानी घेतली.यामुळे कोल्हापूर जिल्हा निबंधक निळकंठ खरे यांना जिल्हा उपनिबंधक चंद्रकांत इंगवले यांनी भ्रमणध्वनीवरुन बैठकीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी दोन ते तीन वेळा भ्रमणध्वनी करून आंदोलकांची भूमिका सांगितल्यामुळे अखेर शुक्रवार दि २७ डिसेंबर २०२४पर्यंत सर्व ५७ सभासद करण्यास मुदत दिली. शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी केलेली मध्यस्थी फलदायी ठरली . शुक्रवारपर्यंत कारवाई नाही झाली तर तहसिलदार कार्यालयाच्या आवारात कोणतीही पुर्व सुचना न देता आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीतील लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केले.या बैठकीस अरविंद धरणगुत्तीकर, माजी सरपंच शेखर पाटील ,पत्रकार बाळासाहेब कांबळे,सुनिल कुरुंदवाडे,रमेश शिंदे, श्रीपती सावंत,जयपाल कांबळे, संजय शिंदे,मिलिंद कुरणे,दिगंबर सकट,शंकर कांबळे,धरणगुत्तीमधील महिला,नागरीक आंबेडकरवादी पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!