दत्तवाड / प्रतिनिधी
परभणी येथील संविधान प्रतिमेची झालेली विटंबना, पोलीस कोठडीत असणारे भिमसैनिक आंदोलक कालकथित सोमनाथ सूर्यवंशी व आंदोलक विजय वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीच्या निषेधार्थ आज गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी दत्तवाड गाव पूर्ण बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला दत्तवाड येथील सर्व व्यापारी,व्यावसायिक, नागरिकांनी आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.नेहमीच गजबजलेल्या गांधी चौक,मेन रोड,दसरा चौक,ग्रामीण रुग्णालय चौक या परिसरात शुकशुकाट जाणवत होता.गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.सकाळी दसरा चौकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे,दादासो कांबळे,सुरज शिंगे,मोहन माळगे,रवींद्र कांबळे,नितीन कांबळे, केशव कांबळे,पितांबर कांबळे,सर्जेराव सोळशे,समुद्र कांबळे,आप्पासो कांबळे,राकेश कांबळे,प्रभू कांबळे,कुलदीप कांबळे,नटराज माळगे,जीवन शिंगे यांचेसह नागरिक,पत्रकार,सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये.यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.