शिरोळ विधानसभा मतदारसंघात चुरशीने ७८.०८ टक्के मतदान,१० उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा २८० मतदारसंघात बुधवारी जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड या तीन शहरासह ५२ गावातील ३०७ मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तर शिरोळमधील १० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्याचबरोबर तालुक्यातील ३०७ मतदान केंद्रावर कर्मचारी व पोलिस असे २ हजार १२ कर्मचार्यांनी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडली. तालुक्यात ३ लाख २९ हजार १४१ मतदारांपैकी २ लाख ५६ हजार ९९१ इतक्या मतदारांनी मतदान केले. त्यामुळे ७८.०८ टक्के मतदान झाले आहे.शिरोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील, महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीकडून उल्हास पाटील यासह अपक्ष असे एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. ४ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचारही धुमधडाक्यात झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिलकुमार हेळकर यांनी बुधवारी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नेटके नियोजन केले होते. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाच्या कालावधीत १ लाख ६३ हजार २२५ पुरूष आणि १ लाख ६५ हजार ८८५ महिलांनी व तृतीयपंथी २ असे एकूण ३ लाख २९ हजार १४१ मतदारापैकी १ लाख ३० हजार ५०५ पुरूष तर १ लाख २६ हजार ४८४ महिला तसेच तृतीयपंथी २ असे एकूण २ लाख ५६ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या मतदार संघात चुरशीने ७८.०८ टक्के मतदान झाले आहे.
जयसिंगपूर शहरात ५१ हजार ७४८ मतदारांपैकी ३६ हजार १२४ मतदारांनी मतदान केले. शहरात ६९.८० टक्के मतदान झाले. शिरोळ शहरात २३ हजार ५९९ मतदारांपैकी १७ हजार ४ मतदारांनी मतदान केल्याने याठिकाणी ७२ टक्के मतदान झाले. कुरूंदवाडमध्ये २२ हजार २२ मतदारांपैकी १६ हजार ८२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. याठिकाणी ७६.४० टक्के मतदान झाले.जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, अब्दुललाट, उदगांव, नांदणी, दानोळी या ठिकाणी सर्वाधिक मतदान केंद्रे होती. त्याचबरोबर इतर गावात कमी जादा प्रमाणात मतदान केंद्रे होती. सकाळी थोडी थंडी असल्याने मतदारांचा कमी प्रतिसाद पहायला मिळाला. ११ नंतर अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. दुपारी पुन्हा मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड याठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता अन्य कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत. सायंकाळी ग्रामीण भागातील एस.टी.बसेसच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन घेऊन मतदान कर्मचारी शिरोळ येथे दाखल झाले.तालुक्यातील ३०७ मतदान केंद्रावर १ हजार ४९१ कर्मचार्यांनी निवडणुकीचे कामकाज केले. लहान मतदान केंद्रावर ४ तर मोठ्या मतदान केंद्रावर ५ असे कर्मचारी नेमण्यात आले होते. तसेच १ डीवायएसपी, २ पीआय, १२ पीएसआय, १६० पोलीस कर्मचारी तसेच ३४५ होमगार्ड असे ५२० दोन्ही विभागाचे एकूण २ हजार ११ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक येथील १ सीआरपीएफ व १ एसआरपी फोर्स यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात डीवायएसपी डॉ.रोहिणी सोळुंके, जयसिंगपूरचे पोलिस निरिक्षक सत्यवान हाके, शिरोळचे पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड, कुरूंदवाडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रविराज फडणीस यांच्यासह अधिकार्यांनी तालुक्यातील शहरे व गावावर पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले.