जाहिरात माध्यम कक्षाकडे 146 अर्जांपैकी 135 अर्ज निकाली, 11 नामंजूर
दाखल अर्जांमधील खर्च 48 लाख 40 हजार रुपये
कोल्हापूर / प्रतिनिधी
विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अंतर्गत जाहिरात प्रमाणिकरणासाठी माध्यम कक्षाकडे आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज 146 होते.यातील 135 अर्जांना मंजुरी देण्यात आली.निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जाहिरातीमधील दुरुस्ती 41 ठिकाणी सुचविण्यात आली,नामंजूर अर्ज 11,दुरुस्तीनंतर प्रमाणिकरण झालेले अर्ज 30,दुरुस्तीशिवायचे मंजूर करण्यात आलेले अर्ज 105 असे एकूण निकाली काढलेले 135 अर्ज आहेत.जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय प्राप्त झालेले अर्ज यामध्ये चंदगड 16, राधानगरी 6, कागल 9, कोल्हापूर दक्षिण 23, करवीर 12, कोल्हापूर उत्तर 20, शाहूवाडी 12, हातकणंगले 19, इचलकरंजी 10, शिरोळ 19 असे एकूण 146 अर्ज प्राप्त झाले आहेत.कोणत्याही भडकावू, दिशाभूल करणाऱ्या किंवा व्देषपूर्ण जाहिराती प्रकाशित होणार नाहीत यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षाचे काम सुरु आहे . आक्षेपार्ह मजकूर जाहिरातीबाबत तातडीने संबंधित यंत्रणेला अवगत केले जात आहे.या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आचारसंहितेच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनेनुसार पेड न्यूज,सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बारकाईने नजर ठेवून कामकाज केले आहे.जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मुद्रीत दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पेड व फेक न्यूज,व्देश व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट बातम्यांवर बारीक नजर ठेवावी तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबधी जाहिरातीचे प्रमाणिकरण करुन घेण्याबाबत कळविण्यात यावे,वृत्तपत्रे,दैनिक,साप्ताहिके,मासिक यामध्ये प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यात आले.यानुसार आजपर्यंत विविध माध्यमांवर करण्यात आलेला खर्च यामध्ये ऑडीओ साठी 11 लाख 26 हजार 500, वृत्तपत्र 15 लाख 48 हजार 511, रेडीओ 1 लाख 84 हजार 718, सोशल मीडिया 6 लाख 56 हजार 383, टि.व्ही. 36 हजार 700, ऑडीओ व्हॉइस कॉल 35 हजार 500 व व्हिडीओ निर्मिती 12 लाख 52 हजार 300 असा एकूण 48 लाख 40 हजार 612 इतका खर्च उमेदवारांच्या प्रचाराच्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त अजून पुढील दोन दिवसात वृत्तपत्र आणि सामाजिक माध्यम तसेच पेड न्यूज़ बाबत खर्च समावेश करण्यात येणार आहे.