मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा – निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा
गृहमतदान,मतदार जनजागृतीच्या उपक्रमांचे केले कौतुक
कोल्हापूर / प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक कालावधीत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरु असून मतदान केंद्रांवर गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या. तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा,अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियुक्त विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिल्या.विशेष निवडणूक निरीक्षक श्री. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मतदानाची पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली,यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,सामान्य निवडणूक निरीक्षक अनुक्रमे अशोककुमार,मीर तारीक अली,स्वेतिका सचन,सुहास एस.,विश्व मोहन शर्मा, पोलीस निवडणूक निरीक्षक अर्णव घोष,खर्च निरिक्षक दिनेश कुमार मीना व श्रीमती आर.गुलजार,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.गृहमतदानाची चांगली टक्केवारी, विद्यार्थ्यांनी पत्रलेखनाव्दारे पालकांना केलेले मतदानाचे आवाहन,लोकशाही दौड,वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री.मिश्रा म्हणाले, मतदार जनजागृतीचे उपक्रम दस्तावेज स्वरुपात जतन करा.या उपक्रमांची व अन्य अभिनव उपक्रमांची माहिती मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य,भारत निवडणूक आयोगाला सादर करा, जेणेकरुन असे उपक्रम अन्य जिल्ह्यातही राबवले जातील.श्री. मिश्रा म्हणाले, विधानसभा निवडणूकीसाठी मंगळवार 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून जिल्ह्यात जास्तीत जास्त टक्के मतदान होण्यासाठी मतदारांशी संवाद साधा. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तसेच भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेले मतदानाचे महत्व मतदारांना पटवून द्या.अंध मतदारांनी केलेल्या मतदानाची जास्तीत जास्त प्रसिध्दी करा.समाज प्रबोधनातून मतदार जनजागृती करत स्वीप कार्यक्रम नियमित सुरु ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या सर्व मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या.शहरी मतदान केंद्रांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होवून मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या. सर्व यंत्रणांनी मिळून मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सूचना श्री. मिश्रा यांनी यावेळी केल्या.श्री. मिश्रा म्हणाले, जिल्ह्यात संपर्क व्यवस्था नसलेल्या मतदान केंद्र स्थळी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घ्या. त्याचबरोबर अशा मतदान केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी मिळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा. मतदानाची आकडेवारी अचूक देण्याचे प्रशिक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना द्या. मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी टपाली मतदान प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींना स्पष्टपणे दिसेल, अशी व्यवस्था करा,असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात 4 हजार 637 पैकी 4 हजार 430 इतके गृह मतदान झाले आहे. जिल्ह्यात 80 टक्यांहून अधिक मतदान होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्रलेखन,मानवी साखळी, प्रभात फेरी, पथनाट्य, चित्रफिती,विविध स्पर्धा, सायकल रॅली, लोकशाही दौड असे अनेक उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगून निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांची तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.