शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा २८० मतदारसंघात आज बुधवारी मतदान प्रक्रिया होणार आहे.तालुक्यातील ३०७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४९१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी सकाळी ३०७ मतदान केंद्रावरील कर्मचार्यांना सकाळी ईव्हीएम मशीन व इतर मतदान साहित्य देण्यात आल्यानंतर कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले.मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्याकरिता ४५ एसटी बसेस आणि १० खाजगी वाहनांची व्यवस्था निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली होती.शिरोळ तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्रे जयसिंगपूर शहरात असून त्यापाठोपाठ शिरोळ, कुरूंदवाड, अब्दुललाट, उदगांव, नांदणी, दानोळी या ठिकाणी जादा मतदान केंद्रे आहेत.बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.शिरोळ विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराचा धुरळा उडाला आहे.महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील,स्वाभिमानीकडून उल्हास पाटील यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.गेल्या एक महिन्यापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या.त्यानंतर मोठ्या धडाक्यात प्रचारही झाला.आज प्रत्यक्षात मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.शिरोळ तालुका प्रशासनाने निवडणुकीची सर्व यंत्रणा सज्ज केली आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे,सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिलकुमार हेळकर यांनी मतदान केंद्रावरील कर्मचारी व बंदोबस्तास असलेल्या कर्मचार्यांना मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या.तालुक्यात ३०७ मतदान केंद्रे असून यासाठी १४९१ कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.प्रत्येक लहान मतदान केंद्रावर ४ तर मोठ्या मतदान केंद्रावर ५ असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच १ पोलीस उपाधीक्षक, २ पोलीस निरीक्षक,१२ पोलीस उपनिरीक्षक,१६० पोलीस कर्मचारी तसेच ३४५ गृह रक्षक दलाचे जवान असे ५२० कर्मचारी तर दोन्ही विभागाचे एकूण २०११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच कर्नाटक येथील १ सीआरपीएफ व १ एसआरपी फोर्स बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.शिरोळ तालुक्यात एकूण मतदार ३ लाख २९ हजार १४१ आहेत.यात महिला १ लाख ६५ हजार ८८५ तर पुरुष १ लाख ६३ हजार २५४ व २ तृतियपंथी मतदार आहेत.शिरोळ तालुक्यातील २०१९ मध्ये ३ लाख१३ हजार ७३२ इतके मतदार होते तर २०२४ मध्ये ३ लाख २९ हजार १४१ इतके मतदार असुन यामध्ये १६ हजार ४०९ इतके मतदार वाढलेले आहेत. वाढलेले मतदारच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.शिरोळ तहसील कार्यालयातून सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे,सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह साहित्याचे वाटप करण्यात आले यानंतर मतदान केंद्र स्थळी जाण्यासाठी मतदान साहित्यासह कर्मचारी नेमून दिलेल्या वाहनातून मतदान केंद्राकडे रवाना झाले.मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया साठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चौकट-
शिरोळ विधानसभा मतदारसंघावर १५ थिमॅटिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
१) धरणगुत्ती-क्षारपड जमीन विकास,२) आगर-उपजिविका, ३) हेरवाड-अपारंपारिक उर्जा, ४) यड्राव-महिला सक्षमीकरण, ५) दत्तवाड- पंचायत सुशासन, ६) दानोळी- स्त्री-पुरूष समानता, ७) संभाजीपूर – बालस्नेही, ८) गणेशवाडी-जलसमृध्दी, ९) शिरोळ- मी आणि माझे संविधान, १०) शिरोळ-जागतिक हवामान बदल, ११) शिरोळ-घनकचरा व्यवस्थापन, १२) जयसिंगपूर-मतदानाचा प्रवास, १३) जयसिंगपूर-पिंक मतदान केंद्र १४) कुरूंदवाड-लघु उद्योजकांचे महत्व १५) कुरूंदवाड-लेक वाचवा.
प्रशासनाकडून मतदान जनजागृती
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवावा याकरिता मतदान जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले होते.मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीचा उत्सवात मतदारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या निवडणुकीत अनेक नव मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे त्यांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती.