अचारसंहिता लागली,मात्र शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्वच शासकीय यंत्रणेला सक्त सूचना दिले आहेत. त्यानुसार शिरोळ तालुक्याच्या सर्वच सीमा भागात तपासणी पथके तैनात केल्या असून कडक बंदोबस्त ही लावण्यात आला आहे.मात्र निवडणूक काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग अजूनही ॲक्शन मोडवर आलेल्या दिसत नाही शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावात बेकायदेशीर देशी दारू विक्री,पानपट्टीमध्ये मिळणारी सुगंधी तंबाखू,सुंगधी सुपारी यासह गावठी हातभट्टीची होणारे वाहतूक आजही राजरोसपणे सुरू आहे.जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला देशी दारूचे अड्डे,पानपट्टीत मावा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.याची माहिती पोलिसांना दिली असता माहिती देणाऱ्या वरच कायद्याचा दंडोका उगारण्यात येत असल्याने नागरिक ही आता वैतागले आहेत.त्यामुळे देशी दारूच्या त्रासलेल्या संतप्त महिला आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन शिरोळ पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रार मांडणार असल्याचे सांगितले आहे.
बेकायदेशीर देशी दारु,सुगंधी पत्ती व सुपारी विक्रीला बिट अंमलदारांचे पाठबळ – नागरिकांचा आरोप
शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरून तीन पानी जुगार, बेकायदेशीर देशी दारू,गावठी दारू वाहतूक व माव्यासाठी लागणारी सुगंधी सुपारी व पत्ती प्रत्येक पानपट्टी मध्ये उघड मिळत असताना ही कारवाई होत नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकातुन पोलीस प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे.खुनी,दरोडेखोर सापडतात पण पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे कसे सापडत नाहीत असा सवाल ही सर्वसामान्य महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.