महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला विश्वासात घ्या अन्यथा शरद पवार गटाचा इशारा

पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार : स्नेहा देसाई

शिरोळ / प्रतिनिधी 
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा प्रमुख घटक पक्ष आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही.राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळाली असे समजून दोन्ही पक्षाचे नेतेमंडळी काम करीत आहेत.मात्र शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी ताकद आहे.पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसाल तर आमच्या पक्षाची ताकद दाखवावी लागेल असा इशारा शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिरोळ येथे पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा सौ स्नेहा वसंतराव देसाई यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिरोळ येथे रविवारी पत्रकार बैठक संपन्न झाली.कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व शिरोळचे माजी सरपंच बी.जी.माने यांनी स्वागत केले.ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिरोळ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांच्या नावावर एकमत झाले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.आघाडीतील पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाहीत.त्यामुळे आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर चर्चा करून सौ.स्नेहा देसाई यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहोत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह उर्फ बंटी जगदाळे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे.मात्र काँग्रेस आणी शिवसेनेकडून आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही.त्यांना विश्वासात घेतले जात नाही.शिरोळ तालुक्यात आमच्या पक्षाची ताकद मोठी असल्याने पक्षाच्या वतीने सौ.स्नेहा देसाई यांनी निवडणूक लढवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या संदर्भात लवकरच वरिष्ठ नेत्यांशी भेट घेऊन आमची भूमिका मांडणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे म्हणाले की महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विश्वासात घेतले नाही.यामुळेच लोकसभेत हातकलंगले मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले.त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून महाविकास आघाडीतील पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.या पक्षाची ताकद लक्षात घेऊन शिरोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ स्नेह वसंतराव देसाई यांना उमेदवारी मिळावी याकरिता आम्ही लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरोळ तालुका महिला अध्यक्षा सौ.स्नेहा वसंतराव देसाई म्हणाल्या की महिला सबलीकरण करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचा आवाज विधानसभेत जावा याकरिता शिरोळ विधानसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिरोळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे.पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदळे,युवक तालुकाध्यक्ष नागेश कोळी,जिल्हा उपाअध्यक्ष बी.जी.माने,तालुका महिला अध्यक्षा स्नेहा देसाई,युवक तालूका उपाध्यक्ष किरण पाटील,उपाध्यक्ष हुजेब जमादार,उपाध्यक्ष विकास उम्रराणी,सामाजीक न्याय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,संदिप बिरणगे , कार्याध्यक्ष निशांत निटवे,सचिव सतिश भंडारे , शिरोळ शहराध्यक्ष धनाजी नाईक,तालुका सरचिटणीस विशाल जाधव,विशाल मोरे, वसंतराव देसाई,फय्याज मोमिन,सुदर्शन वाळके, सुरज भोसले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतराव देसाई यांनी आभार मानले.
Spread the love
error: Content is protected !!