धरणगुत्ती / संभाजी जाधव
आचारसंहीता लागताच शिरोळ तालुक्यात राजकिय हलचालींनी वेग घेतला आहे.इच्छुकांनी जोर बैठकांचा सपाटा लावला आहे.महायुतीच्या पाठींब्यावर विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे पुन्हा विधानसभेच्या मैदानात असणार आहेत.तर
महाविकास आघाडीकडून माजी आम.उल्हासदादा पाटील आणि दत्त उद्योग समुहाचे प्रमुख उद्यान पंडीत गणपतरावदादा पाटील या दोन दादांपैकी कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार कि कोणाला पाठींबा देऊन मैदानातून बाजूला राहणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वंचितसह अन्य कांही अपक्षही मैदानात असणार आहेत. मात्र येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत होणार आहे.त्यामध्ये महायुतीचे उमेदवार आम.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकरांविरोधात महाविकास आघाडीकडून गणपतरावदादा पाटील की उल्हासदादा पाटील या दोघांपैकी कोणत्या दादांची “दादा” गिरी चालेल? याबाबतची चर्चा महाविकास आघाडीतील कांही प्रमुख जबाबदार कार्यकर्तेच करताना दिसत आहेत.गत विधानसभा निवडणुकीत उल्हासदादा पाटील यांनी बहुरंगी झालेल्या लढतीत शिवसेनेकडून अपक्ष उमेदवार यड्रावकरांविरोधात चिवट झुंज दिली होती.मात्र तत्कालीन शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील कांही नेत्यांच्या फंदफितूरी मुळे त्यांचा पराभव झाल्याचे आजही बोलले जाते.त्याच मुळे यड्रावकरांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे या निवडणूकीची तयारी करताना इच्छुक असलेले उल्हासदादा पाटील जपून पावले टाकताना दिसत आहेत.शिवसेना (उबाठा) ने शिरोळ विधानसभेवर उमेदवारीचा हक्क सांगितला असला तरी महाविकास आघाडीच्या वरीष्ठ नेत्यांकडून येथे इलेक्टीव्ह मेरीट बारकाईने तपासले जात आहे.ते पहाता हि जागा काँग्रेस पक्षासाठी सुटून महाविकास आघाडीकडून दत्त उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्यानपंडीत गणपतरावदादा पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते.गतवेळच्या लढतीत काँग्रेसकडून लढलेले जेष्ठ नेते स्वर्गिय डॉ.सा.रे.पाटील यांची उमेदवारी आणि प्रचार यंत्रणा चुकीच्या “हातां” त गेल्याने काँग्रेसला फटका बसला होता.अशी चर्चाही काँग्रेसच्या एका गोटात होत आहे.त्यामुळे गणपतराव दादां पाटलांना उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेसची प्रचार यंत्रणा कोणाच्या “हाता”त असेल यावरच काँग्रेसच्या विजयाची गणिते घडू बिघडू शकतात.असे विश्लेशकांचे मत आहे.गेल्या निवडणूकीतील विजयापासून आम.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा राजकीय वारू चौफेर उधळला आहे.त्याला लगाम घालणे महाविकास आघाडीसमोरचे मुख्य आव्हान आहे.कारण गत
निवडणूकीत सर्व विरोधी उमेदवारांची सर्व बाजूंनी दमछाक करताना साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर त्यांनी केला होता.त्यावेळी एकिकडे “वंचित”चा उमेदवार गॅसवर ठेवताना “स्वाभिमानी” च्या राजकीय सावकारीतील आपली मुद्दल ही यड्रावकरांनी त्यानिमित्ताने काढून घेतल्याचे निकालावरून दिसून आले.एकंदरीत गत निवडणूकीचा निकाल आणि गेल्या चार वर्षातील राजकिय उलाढालींचा मागोवा घेता विकासनिधी खेचुन आणण्यात तो वितरीत करण्यासह शिरोळ तालुक्यातील अन्य राजकिय गटांची तोडफोड करण्यात आम .यड्रावकर आणि त्यांची यंत्रणा माहीर ठरली आहे.२०२४ च्या निवडणूकीत हाच राजकिय धुडगुस ते पुन्हा घालू शकतात हे स्पष्ट आहे. गेल्यावेळी ते अपक्ष लढले.यावेळी त्यांच्याकडे अपक्ष ; शिवसेना(एकनाथ.शिंदे गट) ; किंवा त्यांची नोंदणीकृत शाहू आघाडी असे उमेदवारीचे तिन पर्याय खुले आहेत.लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आवश्यक सामग्रीची तसेच कार्यकर्त्यांची मांदियाळी त्यांच्याकडे तयार आहे.ते खुद्द विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतलेही मानले जातात.उमेदवारीच्या तिन पर्यायांपैकी त्यांची उमेदवारी कुठूनही असली तरी त्यांना यावेळी महायुतीचीही रसद मिळणार आहे. शिरोळ तालुक्यातील या सगळ्या राजकिय पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीकडून संभावित उमेदवार असणारे उद्यानपंडीत गणपतरावदादा पाटील आणि उल्हासदादा पाटील या दोन दादांपैकी कोणते दादा मैदानात उतरतात ? आणि महाविकास आघाडीकडून यड्रावकरांविरोधात कोणत्या दादांची “दादा”गिरी येथे चालणार ? हे पहाणे मोठया औत्सुक्याचे ठरणार आहे.