इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका परिसरात आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन भावांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात आकाश राजू सासने वय 26, रा.नदीवेस नाका हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसातून मिळाली.अधिक माहिती अशी इचलकरंजी शहरातील नदीवेस नाक्यावर एका धाब्यावर सासने हा कामास होता.नेहमीप्रमाणे रात्री ढाबा बंद झाल्यावर सासने हा घरी जात असताना दोन भावांनी मिळून पाठलाग करत सासने याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात मानेवर,हातावर आणि डोक्यात खोलवर वार झाल्याने सासने हा गंभीर जखमी झाला.रात्री उशिरा भांडणाचा जोरात आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आकाश सासने याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाहून नागरिकांनी आईजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,मात्र प्रकृति चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवले.सासने याने हल्ला होताच स्वत:चा बचाव करतेवेळी हातावर शस्त्राने जोरदार वार बसून घटनास्थळी हाताची दोन बोटे तुटून पडली.हल्ला झाल्याचे कळताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी होऊ लागताच संशयित हल्लेखोरांनी पलायन केले.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित झाला.रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला.दरम्यान,सासने याचा दुपारी मुजावर पट्टी येथील एका परप्रांतीय तरुणाशी किरकोळ वाद झाला होता.त्याच ठिकाणी राहण्यास असलेले संशयित दोघे भाऊ राहत होते.त्याठिकाणी आपले वर्चस्व टिकून राहावे याकरीता दोघा भावांनी मिळून सासने याचा काटा काढल्याची नागरिकांतून चर्चा रंगली होती.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला ताब्यात घेतले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.