चालू हंगामात 16 लाख मे.टनापेक्षा जादा उसाचे गाळप करणार
शिरोळ / प्रतिनिधी
दत्त साखर कारखान्याने राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या उसाचा दुसरा हप्ता 100 रुपये देण्याकरिता मान्यता द्यावी, असे पत्र दिले आहे.परवानगी मिळताच कारखाना शेतकऱ्यांना त्यांचे शंभर रुपये अदा करेल. त्याचबरोबर चालू गळीत हंगामात साखर कारखाना 16 लाख मॅट्रिक टना पेक्षा अधिक उसाचे गाळप करेल,साखर उताऱ्यानुसार केंद्र सरकारकडून जी एफआरपी ठरेल ती देण्यास कारखाना पात्र असणार आहे.असे आश्वासन कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिले.
दत्त साखर कारखान्याची 55 वी साधारण व चारिटेबल ट्रस्टची सतरावी वार्षिक साधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली.यावेळी मा.चेअरमन पाटील बोलत होते.कारखान्याचे विद्यमान चेअरमन रघुनाथ पाटील यांनी कारखाना व ट्रस्टच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला. तर कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांनी नोटीस मधील ठरावाचे वाचन केले उपस्थित सभासदांनी सर्व ठरावाला एक मताने हात वर करून बहुमताने मंजुरी दिली.
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरे देण्यात आली. याचबरोबर माझी चेअरमन गणपतराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये स्वीकृत संचालक पदी निवड करावी, शक्तीपीठ मार्गाला विरोध करावा तसेच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांचा निषेधचा ठराव करावा अशा मागणीला सभासदांनी मंजूर-मंजूर घोषणेत मान्यता दिली.
साधारण सभेत कारखान्याला असणारे एकूण 258 कोटी रुपयांचे कर्ज तसेच मल्टीस्टेट धोरणानुसार इंग्रजी भाषेत दिलेला अहवाल, समाज माध्यमातून कारखान्यासंदर्भात प्रसिद्ध झालेली माहिती तसेच दत्त ऊर्जांकुर प्रकल्पाचा नफा तोटा तळेबंद पत्रक, कंपनी ॲक्ट 1956 नुसार स्वतंत्र असून त्याचा कारखाना ताळेबंदात समाविष्ट करता येत नाही.याचा व्यासपीठावरून खुलासा करण्यात आला.
कारखाना व चॅरिटेबल ट्रस्टच्या साधारण सभेमध्ये सर्व संचालक, कार्यक्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामधील पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याकडील अधिकारी सभासद कर्मचारी शेतकरी सभासद कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेसाठी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.