शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा ‘झेंडा’ कोणाच्या खांद्यावर?
तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा ‘ म्होरक्या ‘ कोण?
जयसिंगपूर / अजित पवार
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आप आपल्या पक्षाच्या बळकटी करीता राज्यभर दौरे सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक राजकीय मंडळींनी दौरा केला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा सुरू आहे. परंतु शिरोळ तालुक्यात या जनसन्मान यात्रेचा ‘झेंडा’ कोणाच्या खांद्यावर हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
राज्यात 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदललली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मित्रपक्ष आणि अपक्षांची एकजूट झाली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. या स्थापनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली. अडीच वर्षाच्या कालखंड कसा पार झाला हे काय कळते ना कळते तोपर्यंतच राज्यात सत्तांतर घडून आले. शिवसेनेत फूट पडली आणि ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट उदयास आले.
बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप, मित्रपक्ष आणि अपक्षांची एकजूट झाली आणि राज्यात महायुतीचे सरकार आले. विद्यमान सरकार स्थापन झाल्यानंतर दीड दोन वर्षाच्या कालखंडानंतर लोकसभा निवडणुक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस पक्षाला तेरा, शरद पवार या गटाच्या राष्ट्रवादीला आठ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सात जागा मिळाल्या तर एका अपक्ष खासदाराने विजय मिळवून काँग्रेसला साथ दिली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला बळकटी आली. परंतु महायुतीचे संख्याबळ घटल्याने या निवडणुकीत महायुतीचा भ्रमनिरास झाला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता आप आपला पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री पवार हे राज्यभर दौरे करीत आहेत. नुकतेच शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे येऊन अजित पवार यांच्या नेतृत्वातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. शाहू सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा समरजीतसिंग घाटगे यांच्या हाती तुतारी देऊन कागलमध्ये यश संपादन करण्याचा निश्चय केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा राज्यभर दौरे करत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप या यात्रेची एन्ट्री झालेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात एन्ट्री झाल्यानंतर शिरोळ तालुक्यात या यात्रेला यावेच लागेल. या यात्रेचे नेतृत्व आणि पक्षाचा झेंडा कोणाच्या कोणाच्या खांद्यावर द्यायचा हे मात्र अद्याप सुनिश्चित झालेले नाही. तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘ म्होरक्या’ सापडेना अशी अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात अजित पवार कोणाच्या खांद्यावर हात ठेवतात हे मात्र आता पहावे लागणार आहे.
【 महत्वाचा मुद्दा ]
सध्या तालुक्यात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. त्यांचे तालुकाप्रमुख त्यांना ज्या पद्धतीने आदेश देतात त्या पद्धतीने पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम हे कार्यकर्ते करत आहेत.परंतु शिरोळ तालुक्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्याप तरी ‘म्होरक्या’ सापडलेलाच नाही.