झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून केलं गंभीर जखमी 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पत्नी झोपेत असताना डोक्यात हातोडा मारुन  गंभीर जखमी केल्याची घटना पुलाची शिरोली येथे सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मनीषा सागर कोळवणकर वय वर्ष 34 असे जखमी महिलेचे नाव असून हल्लेखोर पतीचे सागर गोपाळ कोळवणकर वय 38 याला परिसरातील नागरिकांनी पकडून ठेवले आणि जखमी पत्नीला कोल्हापुरातील सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केले.ही घटना पुलाची शिरोलीतील कोरगावकर कॉलनीत घडली.याबाबत घटनांस्थळावरून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनी मध्ये दिलीप पवार यांच्या घरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून भुदरगड तालुक्यातील न्हाव्याची वाडी इथला सागर गोपाळ कोळवणकर हा पत्नी मनीषासह भाड्याच्या घरात राहत होता.तो शिरोली एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत.गेल्या सहा महिन्यापासून सागरचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले जात होते.सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान पत्नी मनीषा झोपलेली असताना सागर याने तिच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोड्याने घाव घातला.तिने जोरात आरडा ओरडा केला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.यावेळी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.तर सागर याला ग्रामस्थांनी पकडून ठेवले व शिरोली एमआयडीसी पोलिसांना याबाबत कल्पना दिली.फोन केल्यानंतर तब्बल एक तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी जखमी मनीषाला उपचारासाठी सीपीआर ला पाठवले.पण मानसिक तणावात असलेल्या सागरला ताब्यात घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर अखेर ग्रामस्थांनी त्याला पकडून रुग्णवाहिकेतून कोल्हापूर सीपीआर मधील सीपीआर पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यालाही उपचारासाठी त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले होते.पण तो सकाळी सीपीआर मधून पळून जाऊन पंचगंगा नदीमध्ये उडी मारल्याची चर्चा शिरोली सह परिसरात सुरू आहे.पण याबाबत पोलिसांच्या कडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.केवळ मारहाणीची तक्रार शिरोली पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
error: Content is protected !!