कुरुंदवाड / प्रतिनिधी
कृष्णा पंचगंगा नदीचा महापूर आल्याने कुरुंदवाड शहरातील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलेल्या पूरग्रस्तांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नाही.ते सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे यामागणीसाठी कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.
निवारा केंद्रातच आम्हाला सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी करत अनुदान मिळाल्याशिवाय निवारा केंद्र सोडणार नाही अशी भूमिका पूरग्रस्तांनी घेतली आहे.
कुरुंदवाड पालिकेवर बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित पूरग्रस्त नागरिकांनी मोर्चा काढला
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे,तानाजी आलासे यांनी केले.कुरुंदवाड शहरातील महापूर आलेल्या परिसरातील 1675 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.200 हून अधिक कुटुंबे निवारा केंद्रात स्थलांतर आहेत.
यावेळी बोलताना माजी आम.पाटील म्हणाले या स्थलांतरित कुटुंबांचा रोजगारीवर उदरनिर्वाह चालतो गेल्या दहा दिवसापासून त्यांच्या घरात पाणी आल्याने ही कुटुंबे निवारा केंद्रात स्थलांतरित आहेत.त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने त्यांची आता आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.
शासनाने त्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्यावे यासाठी पालिका प्रशासनाने त्यांच्या नावाची यादी तहसीलदार कार्यालयाला पाठवावी असे सांगितले.यावेळी स्थलांतरित कुटुंबातील आरती चव्हाण,अनिता तांबडे, मंगल आवळे, कविता आवळे, सुशीला शिकलगार,मालन शिकलगार या महिलांनी पुरामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे.
दवाखाना आणि प्रापंचिक गरजेसाठी बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भागवणे कठीण आहे. यापेक्षाही होते नव्हते ते धान्य संपले आहे. घरात परत गेल्यानंतर पोटाचा प्रश्न मोठा आहे तरी शासनाने आम्हाला सानुग्रह अनुदान देऊन आमच्या या अडचणी दूर कराव्यात असे सांगत आपल्या अश्रूंना वाट करून दिली.
यावेळी प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांनी स्थलांतरित पूरग्रस्तांची तात्काळ यादी तयार करून तहसीलदार कार्यालयाला पाठवून लवकरात लवकर सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख उगळे, दयानंद मालवेकर,राजू आवळे, तानाजी आलासे, बबलू पवार, आण्णाप्पा आवळे आदींनी भाषणे केली.या मोर्चात गणेश गुरव, प्रतीक धनवडे, रियाज नायकवडी, स्वप्निल चव्हाण, मुजफ्फर मुजावर,आर्षद बागवान,नजीर मखमल्ला आदी पूरग्रस्त नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.