श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो.मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यातून कृष्णा नदीचे पाणी मंदिरात जाते व पादुकांवरुन वाहते.
दक्षिणेकडील दरवाज्यातून बाहेर पडते.त्याला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते.नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी ‘श्री’ च्या चरणकमला स्पर्श करून कृष्णा माई दक्षिण द्वारातून बाहेर पडल्याने चालू मौसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.पहाटे पासून ‘दिगंबरा दिगंबरा’च्या जयघोषात शेकडो भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला.कृष्णेचे पाणी सोमवारी मंदिराच्या मंडपामध्ये आले होते.मात्र,पाणी संथ गतीने वाढत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार,याकडे भाविकांचे लक्ष लागले होते.पहाटे दक्षिणद्वार संपन्न झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.पु.श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे.पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलिस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत.