शिरोळ / चंद्रकांत भाट
राजर्षी छ.शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महामानवांचा वारसा जपणाऱ्या शिरोळ तालुक्यात सामाजिक परिवर्तनाची नांदी नेहमीच असते. समाजाभिमूख कार्यात तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक सामाजिक संस्था यांच्यासह पत्रकारही नेहमीच अग्रेसर राहतात. यामध्ये धरणगुत्ती येथील पत्रकार संभाजी जाधव यांनी सुध्दा नेहमीच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक कार्यात सहभाग ठेवला आहे. तालुक्यात सुख सुविधा मिळाव्यात, जनतेचे मुलभूत प्रश्न सुटावेत, यासाठी त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त…
धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील शेतकरी असणाऱ्या जाधव कुटूंबात पत्रकार संभाजी जाधव यांचा जन्म २६ मे १९६५ रोजी झाला. पत्रकारितेची पदवी घेवून शेती व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून जनसेवेचे व्रत स्विकारले. या माध्यमातून आपल्या लिखाणात सामाजिक प्रश्न पोट तिडकीने मांडून ते प्रश्न सुटण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला यामुळे समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आहे गाव विकासाच्या संकल्पना मांडत असताना ती संकल्पना पूर्ण व्हावी यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात यामुळे गाव विकासालाही चालना मिळत आहे त्यांचे पत्रकारितेतील कार्य आजच्या तरुण पत्रकारांना आदर्शवत आहे यामुळेच हाडाचा पत्रकार निर्माण होण्याकरिता ते उदयमुख पत्रकारांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात
सन १९८६ साली डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजित नरदे यांच्या नेतृत्वा खाली तालुक्यातील अन्य सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सोबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या चळवळीत सहभाग घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्यामाध्यमातून तालुका संघटक सचिव या पदावर काम करत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर असलेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग त्यांनी घेवून बळीराजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. तालुका युवक काँग्रेसचे सचिव म्हणून कार्यरत असताना राज्यातील पहिला बीओटी तत्वावर तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर शिरोळ बायपास रस्त्याच्या टोलनाका विरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. हे करत असताना त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे लिखाण केले . शेतकरी चळवळ महापूर अतिवृष्टी अनिष्ट प्रथा ग्रामविकास आदी विषयावर सडेतोड लिखाण करून त्यांनी अनेकवेळा परखड वास्तव मांडले आहे . दैनिक महान कार्य या वृत्तपत्रातून आजवर त्यांनी राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा सहकार कृषी आदी विषयावर प्रभावी लिखाण केलेच आहे त्याचबरोबर जनतेवर होणाऱ्या अन्यायावर लिखाण करून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले आहे त्यांच्या लिखाणाने अनेक सामाजिक प्रश्न सुटून जनतेला न्याय मिळाला आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना निर्भिड पत्रकारिता पुरस्कारही मिळाला आहे
समाजाचे काहीतरी आपण देणं लागतो याचे भान ठेवून नेहमीच पत्रकार संभाजी जाधव यांनी सामाजिक कार्य, आंदोलने यात सहभाग घेवून सर्वसामान्य जनतेचे दुःख हलके करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सध्या ते शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. पत्रकारितेतून आपल्या हातून समाजाभिमूख कार्य घडावे, सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी अविरतपणे धडपड असणाऱ्या व निर्भिड असणाऱ्या पत्रकार संभाजी जाधव यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !