कुरुंदवाड / प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारी संपली.शेवटचा पेपर संपताच वर्गाबाहेर पडत विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.
सुटीमध्ये विविध कोर्स आणि क्लास तर काहींनी मामाच्या गावाला आणि आत्तीकडे जाण्यासाठीचा सुट्टीचा बेत आखत एकमेकांचा निरोप घेतला.परीक्षा संपल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.मात्र निकालाची दुग-दुग ही चेहऱ्यावर दिसत होती.
दरम्यान मुलींनी दहावीचा पेपर दिल्यानंतर तू ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घे मी तिथेच घेणार आहे.असे सांगत एकमेकीच्या चेहऱ्याकडे पाहून धीरगंभीर होऊन चेहऱ्याची मुरकुंडी आवळत भावनिक होत गहिवरल्या होत्या.
दहावीची परीक्षा ही अवघड समजली जाते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर पुढील आयुष्याची दिशा ठरते. त्यामुळे या परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर असतो.वर्षभर विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात.मंगळवारी पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर येवुन विद्यार्थ्यांनी जल्लोश केला.
मागील 15 दिवसांपासून परीक्षेचा असलेला ताण कमी झाल्याने सुटलो बाबा एकदाचे असे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते.विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींसमवेत सेल्फी काढल्या.परीक्षा आणि पेपरविषयी चर्चा करत आपल्याला किती टक्के गुण मिळतील, पुढे कोणत्या विषयात करिअर करायचे याची चर्चाही काही विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती.
परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांची भेट घेऊन परीक्षा पास होणार असा विश्वास दिला. काहींनी गळा-भेट घेऊन वर्षभरात माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा असे सांगत पायापडून आशीर्वाद घेत एकाद्या निरोप समारंभा सारखे वातावरण निर्माण केले होते.