अखेर धनाजीराव जगदाळे यांनी सत्ता हिसकवल्याचा वचपा काढला

Spread the love

नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत दत्तगुरु आघाडीची सत्ता

 

३ सदस्य फुटल्याने दत्तराज आघाडीला मोठा धक्का

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

नृसिंहवाडीच्या राजकीय उलथापालथ झाली असून जगदाळे-धनवडे युतीच्या दत्तगुरु ग्रामविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.सत्ताधारी दत्तराज आघाडीतून २ सदस्यांसह बाहेर पडत रमेश मोरे यांची पुन्हा एकदा उपसरपंच पदी वर्णी लागली आहे.आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या उपसरपंच निवडीत ६ विरुद्ध ३ अशा बहुमताने मोरे यांची उपसरपंच पदी निवड झाली.दत्तराज आघाडीतून ग्रा.प सदस्य रमेश मोरे विद्या कांबळे,अनघा पुट्टो पुजारी बाहेर पडल्याने नृसिंहवाडीच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.

 

उपसरपंच पदाची निवड निवडणूक अधिकारी अमित पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे, चेतन गवळी, चित्रा सुतार हे दत्तगुरु आघाडीच्या सदस्य व बाहेर पडलेले ३ सदस्य अशा बहुमताच्या समीकरणामुळे दत्तराज आघाडीचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.दरम्यान,मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दत्तराज आघाडीकडून मंगल खोत यांनी अर्ज दाखल केला होता.प्रत्यक्ष मतदानावेळी त्यांच्या बाजूने केवळ ३ मते पडली तर सदस्या पूनम जाधव या अनुपस्थित होत्या.

 

 

निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच रमेश मोरे यांनी गेल्या तीन वर्षात कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून विकासात्मक कामांसाठी दत्तगुरु आघाडीला पाठिंबा दिल्या असल्याचे सांगितले. तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व सदस्यांसह आपण बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

 

माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले, “केवळ विरोध म्हणुन आम्ही कधी राजकारण केले नाही. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही आमचा विरोध दर्शवला आहे. मोरे यांच्यासह तीन सदस्यांनी धैर्य दाखवत पाठिंबा दिल्याने आता आम्ही लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणार आहोत.

 

यावेळी माजी उपसरपंच अनंत धनवडे म्हणाले, हेव्यादाव्यांच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीला घरघर लागली होती. त्यामुळे अशा गलिच्छ राजकारणाविरुद्ध हा एक प्रकारे गावानेच उठाव केला आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधारी दत्तराज आघाडीवर घणाघाती आरोप केले.

 

विनोद पुजारी यांनी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी सागर धनवडे, शशिकांत बड्ड पुजारी, रमेश सुतार, बजरंग कांबळे, उत्तम पुजारी, प्रतीक धनवडे, अजय कंदले, संदीप खोचरे, किरण माने, मधुकर गवंडी, राकेश सुतार, विनायक काळे, जनार्दन कुमठेकर, सागर मोरबाळे, राकेश खिरुगडे, गणेश सुतार, प्रीतम साळुंखे, सनी माने, सुनील धनवडे, अमित गवळी, शिरीष सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चौकट…
गतवर्षीच्या ग्रामपंचायत कार्यकाळात दत्तराज आघाडीने जगदाळे गटाचे तीन सदस्य फोडून सत्ता हस्तगत केली होती.त्याचीच यंदा पुनरावृत्ती करत धनाजीराव जगदाळे यांनी सत्ता हिसकवल्याचा वचपा काढला आहे.यात सागर धनवडे यांची किंगमेकरची भूमिका निर्णायक ठरली आहे.तर दत्तराज आघाडीच्या सदस्या पूनम जाधव या अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.

error: Content is protected !!