कोल्हापूरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणी करिता शेतकरी संघटनेने कळसुबाई शिखरावर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले
पु.शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात स्थापन व्हावे, या मागणी करिता कोल्हापुर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर “उच्च न्यायालयासाठी उच्च शिखरावर” अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले. यावेळी बोलताना ॲड माणिक शिंदे म्हणाले की सहा जिल्ह्यातील वकील बंधू गेली 35 वर्षे सनदशीर मार्गाने खंडपीठ कोल्हापूरात होण्यासाठी आंदोलन करीत आहेत. सर्व वकील हे आंदोलन या सहा जिल्ह्यातील पक्षकारांच्या व शेतकरी बंधूंच्या करीता करीत आहेत. पण सरकार अजूनही खंडपीठ स्थापन करीत नाही. खंडपीठ स्थापन करतो असे वारंवार आश्वासन दिले जात आहे पण ते आश्वासन पूर्ण होत नाही. सरकारच्या या धरसोड धोरणामुळे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना माननीय जिल्हा न्यायालयातील निकाला विरुद्ध माननीय उच्च न्यायालयात आर्थिक अडचणीमुळे दाद मागता येत नाही. त्यातच या सहा जिल्ह्यातून मुंबईचे अंतर 400 किलोमीटरच्या आसपास असल्यामुळे त्यांना जनावरांचे चारापाणी, धारा सोडून मुंबईला जाता येत नाही.सहा जिल्ह्यातील बरेच शेतकरी जिल्हा न्यायालयातील निकालावर अपील करू शकत नाहीत. त्यामुळे या सहा जिल्ह्यातील शेतकरी राज्यघटनेद्वारे दिलेल्या न्यायाच्या हमीपासून व हक्कापासून वंचित राहत आहेत .त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई या उच्च शिखरावर “उच्च न्यायालयासाठी फलक फडकविण्यात आला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड माणिक शिंदे म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या मागणी करता आज उच्च शिखरावर आलेलो आहे. आता तरी सरकारला आमचा आवाज ऐकू येईल व सरकारला जाग येईल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कोल्हापूर येथे माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ अगर सर्किट बेंच स्थापन करावे अशी विनंती महाराष्ट्र सरकारला केली .यावेळी विनायक चव्हाण, धनाजी चौगले, सुरेश पाटील, नंदकुमार जाधव, धनाजी काशीद, श्रीधर चौगले, डॉ बी. एम. जाधव, संदीप संकपाळ कराड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.