एकसंबा – मलिकवाड माळावर पुन्हा एकदा रंगणार शर्यतीचा थरार
आ.प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; ५१ लाखांची बक्षिसे
एकसंबा / प्रतिनिधी
चिकोडी – सदलगा भागाचे भाग्यविधाते, माजी मंत्री, विद्यमान विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त ५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५१ लाख रुपयांच्या रोख रकमेची बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आली आहे.यामुळे सुप्रसिध्द मलिकवाड माळावरील शर्यत मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
मलिकवाड माळावर आयोजित एकसंबा शर्यत मैदान हुक्केरी पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली ५ रोजी सायंकाळी पार पडणार आहे.त्या दृष्टीकोनातून गेल्या कांहीं वर्षापूर्वी आयोजित होणाऱ्या शर्यत मैदानावर जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.सदर शर्यत मैदानाची हुक्केरी कार्यकर्त्यांकडून नुकताच पाहणी कऱण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एकसंबाचे नगरसेवक सुनिल सप्तसागरे यांनी आ.प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिनी विना लाठी काठी भव्य जनरल बैलगाडा शर्यत आयोजन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यानुसार तयारी करण्यात येत आहे.लाखो शर्यत शौकिनाना पाहण्यासाठी सर्व नियोजन करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.
यावेळी गुरूदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील, नगरसेवक उमेश सातवर,संभाजी पाटील,अक्षय इंगळे, मल्लू हावलदार,अण्णा चिनगे,किरण माळी,निवास करजगे,महादेव गजबर,कृष्णा थरकर,सचिन माळी यांच्यासह एकसंबा-मलिकवाड परिसरातील शर्यत शौकीन उपस्थित होते.