दुसऱ्या फळीतील वक्तृत्व संपन्न तगड्या कार्यकर्त्याची वानवा निवडणुकीत उभारी देईल का?
जयसिंगपूर / अजित पवार
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना येत्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी, भाजप प्रणित महायुतीत अथवा एकला चलो रे चा नारा देण्या अगोदर आपल्या संघटनेत दुसऱ्या फळीतील तगड्या कार्यकर्त्यांची फळी आहे का? याची चाचपणी करून नेमक्या कोणत्या प्रवाहातून मार्गक्रमण केल्यास आपला प्रवास सुखकर होईल. याचे आत्मपरीक्षण करावे.यामुळे राजू शेट्टी यांचा राजकीय प्रवास सुखकर होईल का? अशी दबक्या आवाजात हातकलंगले मतदार संघातील मतदारातून चर्चा होऊ लागली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन वेळा लोकसभा निवडणुकीत आपला विजय खेचून आणला.परंतु 2019 च्या निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांनी त्यांना पराजित केले. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये राजू शेट्टी यांच्यात अंतर्गत मतमतांतर वाढले आहे.शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर पहिल्यांदा लोकसभा जिंकली.दुसऱ्यांदा मोदी लाटेच्या प्रवाहात सामील होऊन विजयश्री खेचून आणली.यावेळी भाजप सरकारने त्यांना एक आमदारकी व एक वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केले.त्यामुळे त्यांचा महायुतीतील समावेश इतर कार्यकर्त्यांना पदे उपभोगण्यास मिळाल्यामुळे दिलेला शब्द पाळला असे भाजप युतीकडून बोलले जात आहे.परंतु शेट्टी यांनी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला नसल्याचे कारण पुढे करत भाजपाशी फारकत घेतली.
या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर भाजप प्रणित सरकारने शेट्टी यांचे खंदे समर्थक असलेले आणि मुलुख मैदान तोफ सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले. आणि पारडे आपल्या बाजूने वळवून घेतले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुसरा तगडा आणि वक्तृत्व संपन्न असलेला नेता भाजपच्या गळाला अपसुकाच लागला. शेट्टी आणि खोत यांच्यात निर्माण झालेली दरी भाजपच्या पथ्यावर पडली.सध्या बुलढाण्यातील युवा नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्याबरोबर फारकत घेतली आहे. या फारकतीमुळे राजू शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात त्याचा काही फरक पडत नसला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारकिर्दीस मोठा सुरुंग आहे. त्यातच महिला आघाडीच्या पूजा मोरे यांनी सध्या भाजपबरोबर हात मिळवणी केली आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्याशी राजकीय एकोपा या दोघांमधील दुरावला आहे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याशी शेट्टी यांनी हात मिळवणी केली. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात यातून काय मिळणार हाही प्रश्न गुलदस्त्यात आहे.
एकला चलो रे चा नारा दिला तर शेतकऱ्यांच्या विषय सोडून आपल्याकडे सामाजिक प्रश्नाचे वक्तृत्व संपन्न असा कोणताही दुसऱ्या फळीतील नेता नाही. त्यातच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले अनेक उमेदवार समोर उभे ठाकले जाण्याची शक्यता गृहीत धरून शहरी भागातील मतदान खेचण्यास राजू शेट्टींना कितपत यश येईल हा विषय मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.
होऊ घातलेल्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास विद्यमान खासदार भाजप प्रणीत असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्यासमोर हे आव्हान उभे होणार आहे. धैर्यशील माने हे तगडे उमेदवार असल्यामुळे त्यांना झुंज द्यावी लागेल. काँग्रेस प्रणित शरद पवार गटाबरोबर अथवा एकला चलो रे अशी भूमिका घेऊन निवडणूक लढवली लढविल्यास फायद्याचा ठरू शकेल याकरिता त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे.
चौकट
राजू शेट्टी द्विधा अवस्थेत
२००९ मध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर २०१४ मध्ये मोदी लाटेत लोकसभा जिंकणाऱ्या राजू शेट्टींना २०१९ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या लोकांनी माझा पराभव केला असे ते सतत म्हणत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका त्यांनी घेतली आहे. परंतु त्यांच्या कार्यक्रमातून महाआघाडीला टारगेट आणि महायुतीला पायघड्या असे दिसून येत आहे. इस्लामपूर मतदार संघातील समडोळी या गावात नुकतेच राजू शेट्टी, पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची संयुक्त सभा झाली. या सभेमध्ये निशिकांत पाटील आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केले. यामध्ये दोघांनीही आपल्याला सोयीस्कर भूमिका घेतल्याचे दिसून आले.