शिरोळ / प्रतिनिधी
३१ डिसेंबर २०२० पूर्वीच्या गुंठेवारी विकासातील अनधिकृत भूखंड व बांधकामे शासनाच्या आदेशानुसार नियमित करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.त्यानुसार गुंठेवारी प्लॉटधारकांनी भूखंड व बांधकाम नियमित करण्यासाठी नगरपालिकेकडे प्रस्ताव सादर करावेत. पालिकेने मागितलेल्या कागदपत्राची जुळवा जुळव करून नागरीकांनी पालिकेकडे जमा करावेत असे अहवान पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिले.
शिरोळ येथे गणेशनगरमधील गणपती मंदिरात नागरीकांना मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.यावेळी मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील म्हणाले,गेली ३३ वर्षे प्रलंबित असलेला शिरोळ येथील हद्दवाढ नियमितीकरणाचा प्रश्न तांत्रिक कारणात अडकला होता. जवळपास ३ हजार ४०० हून अधिक कुटुंबांना चावडीमधील शेतसारा व घरफाळा अशी दुहेरी कर भरावा लागत आहे.त्यामुळे नगरभूमापन कार्यालयाकडून मोजणीची प्रक्रिया देखील राबविण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी पालिकेने मागितल्याप्रमाणे कागदपत्राची पुर्तता करावी त्यानंतर हा प्रश्न नागरीकांना सोडवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी याबाबतची माहिती दिली.त्यानंतर पांडूरंग माने,बंडू स्वामी यांच्यासह मिळकत धारकांनी यांनी विविध प्रश्ने विचारली यावर पालिकेच्या अधिकार्यांनी उत्तरे दिली.
यावेळी पालिकेचे रचना सहाय्यक अभियंता जीवन सरडे म्हणाले,नागरीकांनी गुंठेवारी नियमितीकरणासाठी नियुक्त विहीत नमुन्यातील अर्ज,जागेचा ७/१२उतारा (३ महिने आतील),जागेचा नकाशा (३ महिने आतील),जागेचे खरेदीदस्तची झेरॉक्स प्रत,अभिवचन पत्र (बॉन्डवर), कब्जेपट्टी पत्र (बॉन्डवर), संपूर्ण गटाचा मंजूर रेखांकन नकाशाची झेरॉक्स प्रत, ज्या भूखंडाचे गुंठेवारी विकास नियमितीकरणेचे आहे, त्या भूखंडाचे नोंदणीकृत अभियंत्याकडून प्लॉटचा नकाशाची ३ प्रती, हमीपत्र (बॉन्डवर) जागेवर बांधकाम असेलतर, संमतीपत्र (बॉन्डवर) जागेमध्ये सहहिस्सेदार असेलतर, घरफाळा व पाणीपट्टी चालू वर्षात भरलेली पावती झेरॉक्स (ना-हरकत दाखला) ही कागदपत्रे पालिकेकडे जमा करण्याचे अहवान करण्यात आले.यावेळी भरत माने,अनुपम बाबर, सतिश आडगुळे,अरविंद पाटील,दादा माळगे,विजय आरगे,संदिप चुडमुंगे,मधुकर कुरणे,मनोहर रणदिवे, अजय पाटील,मधूकर साळुंखे यांच्यासह मिळकत धारक उपस्थित होते.