मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन झाले तीव्र
शिरोळ / प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर शिरोळवासीयांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.
गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अंतरावली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले.यामुळे मराठा समाजात शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात भावना व्यक्त होत आहे हे आंदोलन तीव्र करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या बंदला सर्वत्रच प्रतिसाद मिळाला.
शिरोळ शहरातील व्यापारी नागरिक उद्योजक यांनी आपले व्यवहार दिवसभर बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला.शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद होती.त्यामुळे शहरात सर्वत्र सामसूम दिसत होती गजबजलेले संभाजी चौक शिवाजी चौक बस स्थानक परिसर तहसील कार्यालय या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता.
दिवसभर रस्त्यावर तुरळक वाहनांची वर्दळ सुरू होती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी येथील शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिरोळमध्ये महाराष्ट्र बंद शांततेत पण उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.