जयसिंगपुरात संभाव्य उमेदवार ‘ढेपाळले’
वाढत्या खर्चाला घाबरून ‘तलवार म्यान’ केली काय?: शहरात चर्चेला उधाण
जयसिंगपूर / अजित पवार
जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मैदानात उतरू पाहणारे संभाव्य उमेदवार वाढत्या खर्चाला घाबरून ‘ ढेपाळले ‘आहेत.यामुळे मतदारातून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.आपणच उमेदवार असू अशा संभाव्य उमेदवारांनी आपली ‘तलवार म्यान’ करून बसले का काय? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
२०१६ मध्ये पालिकेच्या सर्वत्रिक निवडणूक निवडणुका पार पडल्या.यानंतर २०२१ मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते.पण देशात कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.निवडून आलेल्या तत्कालीन सदस्यांची मुदत संपून सुमारे दोन वर्षे लोटली आहेत.
यावर्षी निवडणूक होईल असे अपेक्षित धरून गेल्या तीन चार वर्षांपासून कामाला लागलेले उमेदवार शिवजयंती, गणेशोत्सव यासह अन्य सामाजिक उपक्रमात मोठ्या हिरिरीने भाग घेत होते.त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे जनतेसमोर मांडण्यास आणि प्रचारास जणू सुरुवातच केली असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. या काळात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यास मात्र हे कार्यकर्ते मागेपुढे पाहत नव्हते.
पण सध्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला असल्याचे या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. आपलाच माणूस नगरसेवक होणार अशी आस उराशी बाळगून कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या संभाव्य उमेदवाराच्या प्रचाराचे उद्दिष्ट हातात ठेवले. त्यानुसार संभाव्य प्रभागाची रचना डोक्यात ठेवून मतदारांना कोणी कप वाटले,कोणी वह्या वाटल्या,कोणी शालेय साहित्य वाटले,तर काहींनी विविध स्पर्धा घेऊन आपली छाप उंचावण्याचा प्रयत्न केला.
काहींनी मतदारांशी आपला संपर्क व्हावा याकरिता संपर्क कार्यालये ही थाटली.अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपणच यांचे कैवारी असल्याचा आव काही संभाव्य उमेदवारांनी आणला होता.
पण निवडणुकीचा कार्यक्रम जस जसा लांबत जाईल तस तसे हे संभाव्य उमेदवार गल्लीबोळातून कोठेही फिरताना दिसत नाहीत.विविध धार्मिक कार्यक्रमात बक्षिसांची रक्कम, ज्यादा रकमेची पट्टी, वह्या वाटणे, शालेय साहित्य वाटणे बंद केले आहे. तसेच वाढदिवस साजरे करणे अशा कार्यक्रमांना आता या संभाव्य उमेदवारांनीच डोळे झाक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
तर काहींनी थाटलेली संपर्क कार्यालये बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर मैदानात उतरू पाहणारे संभाव्य उमेदवार वाढत्या खर्चाला घाबरून ‘ढेपाळले’ आहेत.यामुळे मतदारातून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. आपणच उमेदवार असू अशी संभाव्य उमेदवार आपली ‘तलवार म्यान’ करून बसले का काय? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.