इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील शास्त्रीय नृत्यकला क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नृत्यशिक्षिका व कलाकार सौ. सायली होगाडे यांना कथ्थक आणि भरत नाट्यम् या शास्त्रीय नृत्यामधील प्राविण्य व दिलेल्या योगदानाबद्दल, बळीराम कवडे चारिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा त्रैवार्षिक कलाभूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
कवडे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक बळीराम कवडे आणि महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून सायली होगाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच यावेळी शंकरराव बुचडी, बेळगाव यांना समाजभूषण पुरस्कार तर महादेवराव इदाते कोल्हापूर यांना उद्योग भूषण पुरस्कार आणि डॉक्टर पूनम कवडे व देवेंद्र कवडे यांना विशेष प्राविण्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमात प्रकाश सातपुते आणि बळीराम कवडे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. “आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबरच समाजासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी केलेली निवड अभिनंदनीय आहे” असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सौ.वनिता ढवळे यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सेक्रेटरी मोहन हजारे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंगचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तसेच श्रीमती उमा राजेंद्र कवडे यांनी कार्याध्यक्ष या नात्याने मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व सत्कार मूर्तींनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष पंढरीनाथ साखरे व संचालक पांडुरंग कवडे आणि उमेश हजारे उपस्थित होते. कोल्हापूर येथील चौंडेश्वरी मंदिर सभागृह मंगळवार पेठ येथे सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी श्रुती कवडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास निमंत्रित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.