कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर,कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत,विभागीय क्रीडा संकुल,शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत,रंकाळा सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर,आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,इचलकरंजी महानगरपालिकेचे उपयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.