कोल्हापूर / प्रतिनिधी
आरेाग्य विषयक तपासण्या कमीत-कमी वेळेत करणाऱ्या टेल्थ हेल्थ केअर मशिनचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सीपीआर चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, टेल्थ केअरचे संचालक व्ही.पी.सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सर्वानंद बाबू, उपाध्यक्ष पी.एन. हजीब, वैद्यकीय तंत्रज्ञ डॉ. कवियारासन अनबल्गन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या मशीनचा उपयोग विविध प्रकारच्या आजारांच्या तपासण्या, तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वी जलद गतीने रक्त तपासणी करुन घेण्यासाठी तसेच आरोग्य तपासणी शिबिरांमध्येही चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांसाठी हे मशीन घेण्याबाबत विचार करु, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
या मशीनद्वारे रक्त, लघवी, हृदय रोग, टायफाईड, कोविड, चिकनगुनिया, मलेरिया तसेच किडनी संबंधी आजारांच्या तपासण्या देखील कमीत कमी वेळेत केल्या जात असल्याची माहिती संचालक व्ही. पी. सिंग यांनी दिली. रुग्णालयांबरोबरच घरी देखील याचा वापर करता येऊन संसर्ग देखील टाळता येतो. तातडीच्या वैद्यकीय उपचारामध्ये हे मशीन उपयुक्त ठरत असून देशभरातील विविध राज्यांमध्ये “चिकित्सा आपके द्वार” द्वारे या मशीनचा वापर चांगल्या प्रकारे सुरु असल्याची माहिती डॉ. अन्बलगन यांनी दिली.या मशीन चा उपयोग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी करण्यात येऊ शकतो का याबाबत डॉ.सुप्रिया देशमुख यांनी चर्चा केली.