नृसिंहवाडी / प्रतिनिधी
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यबंकेश्वर, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तधाम येथे रविवार दि.७ रोजी विनामुल्य एकदिवसीय हिवाळी मुल्यसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.मुल्यसंस्कार विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक तालुक्यात रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजीत या हिवाळी एकदिवसीय शिबिरामध्ये पालक आणि पाल्य यांच्याशी निगडीत असलेल्या महत्वपुर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिबिराच्या ठिकाणी मुलांचा सर्वागिण विकास साधण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयावरील ज्ञानदालने उभारण्यात येणार आहेत.मुलांचा पंचेद्रिय विकास कसा असावा व त्याची असलेली आवश्यकता या विषयावर प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.मुलांनी चांगला- वाईट स्पर्श कसा ओळखावा,स्वसंरक्षण तंत्र,प्रशिक्षण,आदर्श दिनचर्या,विविध खेळ,चित्रकला स्पर्धा,पाककला स्पर्धा,किल्ले बनवा स्पर्धा,भारतीय कायद्याची ओळख,रांगोळी स्पर्धा,आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे.मुलांना मोबाईलचे लागलेले वेड,व्यसन मोबाईलचा अतिरेकी वापर त्याचा दुष्परिणाम,तसेच मुलांचा हट्टी ,रागीट स्वभाव पालकानी कसा हाताळावा,मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवावी अशा विविध समस्यावर समुपदेशन करण्यात येणार आहे.या शिबीराच्या आयोजनातुन ‘वृद्धाश्रममुक्त भारत’अभियानाचा हेतु व मुल्यसंस्काराची गरज विषद करण्यात येणार आहे.
विविध उपक्रमातुन मुलांच्या कलागुणास प्रोत्साहन देण्याचा मानस या विभागाचा आहे.याचा सर्व पालक-पाल्य यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,नृसिंहवाडी यांच्याकडुन करण्यात आले आहे.